सुंदर-स्वच्छ डोंबिवलीवर भर, नागरिकांनाही दिली कर्तव्यांची जाणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:34 AM2018-03-19T03:34:54+5:302018-03-19T03:34:54+5:30
हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी स्वागतयात्रा काढण्याची गेल्या २० वर्षांची परंपरा जपणाऱ्या डोंबिवलीच्या शोभायात्रेत यंदाही गर्दीने उच्चांक गाठला.
डोंबिवली : हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी स्वागतयात्रा काढण्याची गेल्या २० वर्षांची परंपरा जपणाऱ्या डोंबिवलीच्या शोभायात्रेत यंदाही गर्दीने उच्चांक गाठला. शहरावर घाणेरडेपणाची टीका झाल्यानंतर गणेश मंदिर संस्थानने साकारलेला नागरिकांची कर्तव्ये, सुंदर व स्वच्छ डोंबिवली या विषयावरील चित्ररथ प्रमुख आकर्षण ठरला. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका व नागरिकांच्या कर्तव्यांचा भला मोठा फलक त्यावर होता.
ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझीमच्या तालावर फेर धरणारे विद्यार्थी यांचा जल्लोष त्यात पाहायला मिळाला. या तालावर विविध संस्थांचे चित्ररथ आपापला संदेश घेत पुढे सरकत होते. काही ठिकाणी यात्रेत सहभागी असलेल्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, तर कुठे पुष्पवृष्टी केली जात होती. हा स्वागतयात्रेचा डौल, जल्लोष आणि संदेश पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली.
भागशाळा मैदानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती राहुल दामले व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी गुढीचे पूजन केले. पालखी पूजन करुन यात्रेला प्रारंभ झाला. यंदा यात्रेत ढोलताशा पथकाला ढोल ताशा वादनाची परवानगी देण्यात आली होती. जन गण विद्यामंदिराचे विद्यार्थ्यांचे लेझीम पथकासह सहभागी झाले होते. या सगळयात आदिवासी नृत्य हे भाव खाऊन जाणारे ठरले. घुंघुर काठी व फेर धरुन नृत्य आणि काठीवर तोल साधणे हे सगळे विलोभनीय होते.
फेरीवालामुक्तीचा संदेश देणारा चित्ररथ वनवासी कल्याण आश्रमाने साकारला. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनीही फेरीवाल्यांकडून भाजी व अन्य गृहोपयोगी वस्तू खरेदी करुन नका, असे आवाहन के ले. साळी समाजाचे कार्यकर्ते सैनिकी वेशभूषा परिधान करुन होते. टेम्पो वाहूतक संघटनेने काढलेली रांगोळी सगळ््याचे लक्ष वेधून घेत होती. सिंधुदुर्ग रहिवासी संघटनेने स्वच्छतेचा, तर डोंबिवली ग्रंथालयाने वाचनाचा संदेश दिला. मनोदय ट्रस्टने सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष संवादावर भर देणारा संदेश दिला. मनशक्ती केंद्राने
स्मार्ट पिढी चारित्र्यसंपन्न व्हावी असे आवाहन केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेने व्यसनमुक्तीचा संदेश दिला. स. वा. जोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन इंडियाचा संदेश दिला. डोंबिवली सांस्कृतिक परिवाराने ई बँकिंगचा वापर करा असे आवाहन केले. फिडींग इंडियाने अन्नाची नासाडी करु नका, असा संदेश दिला. उर्जा फाऊंडेशनने प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारा देखावा चितारला. सायकल क्लबने फिट रहा तर कोकण कुणबी रहिवासी संघटनेने मोबाईल वापराचा अतिरेक टाळा, असे चित्ररथ
तयार केले. क्षितिज संस्थेने बाजीप्रभू चौकात फुलांचे प्रदर्शन भरवले.
>बुलढाण्याचा ‘बालयोगी’
योग विद्याधामच्या विद्यार्थ्यांनी योगासने केली. बुलढाण्याहून वरद जोशी हा सात वर्षाचा विद्यार्थी आला होता. टीव्हीवर पाहून तो योगासने शिकला. डोंबिवली सांस्कृतिक नगरीचे नाव ऐकून तो योगासने सादर करण्यासाठी आला. वरद हा सगळ््यांचे ध्यानार्षण करणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगाला प्रोत्साहन देतात. मात्र वरदला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.त्याला जागतिक पातळीवर नाव कमावण्याची इच्छा आहे.
>भाजपा-शिवसेनेकडून स्वागतयात्रा हायजॅक
डोंबिवलीची स्वागतयात्रा राज्यभर चर्चेचा विषय ठरतो. मात्र यंदा ही स्वागतयात्रा राजकीय पक्षांनी हायजॅक केल्याचे दिसून आले. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानापासून पूर्वेतल्या गणेश मंदिरापर्यंत ही स्वागतयात्रा जाते. मात्र या संपूर्ण रस्त्यावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने झेंडे लावत बॅनरबाजी केली होती.
>चित्ररथांची संख्या रोडावली
स्वागत यात्रेत दरवर्षी ७० पेक्षा जास्त चित्ररथ सहभागी होत होते. यंदा केवळ ५९ चित्ररथ सहभागी झाले. त्यामुळे सहभागी संस्थांची
संख्या रोडावल्याचे दिसून आले.
>ग्रामीण भागात आध्यात्मिक संदेश
डोंबिवली : पिंपळेश्वर महादेव भक्तमंडळातर्फे काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेतून आध्यात्मिक संदेश देण्यात आला. तसेच मंदिरात ह.भ.प रमेश महाराज चाळीसगाव यांचे कीर्तन सादर क रण्यात आले. कीर्तनातून प्रबोधन करीत मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सोनारपाडा ते पिंपळेश्वर मंदिर आणि स्टार कॉलनी ते पिंपळेश्वर मंदिर अशा दोन ठिकाणाच्या उपयात्रेचा समारोप पिंपळेश्वर मंदिरात होतो. या यात्रेत श्री गणेश मंडळ आणि शंखेश्वरनगर विद्यालय या दोन शाळांच्या लेझीम पथकाने सहभाग घेतला होता. अनंत संप्रदायाचे वारकरी दिंडीत सहभागी झाल्याची माहिती प्रकाश म्हात्रे यांनी दिली.