आडीवली-ढोकळी येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:08+5:302021-08-18T04:47:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी खड्ड्यांतील चिखल व पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल घेत ‘केडीएमसी’ने त्या परिसरातील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आडीवली-ढोकळी परिसरातील रस्त्यांमध्ये खड्डे पडले होते. तसेच रस्ता चिखलमय झाला होता. त्यातून मार्गाक्रमण करणे नागरिकांसाठी जिकिरीचे झाले होते. त्यावेळी संतप्त नागरिकांसह पाटील यांनी आंदोलन करीत महापालिकेचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. प्रशासनाने ‘आय’ प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी एक कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. त्यातूनच आडवली-ढोकळीतील खड्डे बुजविण्याच्या कामाला मंगळवारपासून सुरुवात झाली. या कामाची पाहणी पाटील यांनी करताना, काम चांगल्या प्रकारे करण्याची ताकीद कंत्राटदाराला दिली.
दरम्यान, टाटानाका परिसरातील मल्हार नगरातील ७५ मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी खराब झाली आहे. परिणामी पाणी कमी दाबाने येत असल्याने तेथील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे तेथील समस्या सोडविण्यासाठी १०० मि.मी. व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्याची दखल घेत महापालिकेने चार लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. या कामासंदर्भात महापालिकेचे अभियंते अमित मादगुंडी यांच्यासोबत पाटील यांनी पाहणी केली. या वेळी काम तातडीने सुरू करण्याची सूचना पाटील यांनी मादगुंडी यांच्याकडे केली आहे.
-------------