पालिकेच्या परिवहन सेवेत ईटीएमची सुरुवात; पंचिंग मशिन हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 06:06 PM2018-01-07T18:06:20+5:302018-01-07T18:06:33+5:30
ईटीएम (इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशिन)द्वारे बस तिकीट देण्याच्या प्रक्रियेस महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आल्याने पारंपरिक पंचिंग यामुळे हद्दपार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेतील बसमध्ये ईटीएम (इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशिन)द्वारे बस तिकीट देण्याच्या प्रक्रियेस महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आल्याने पारंपरिक पंचिंग यामुळे हद्दपार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या पालिकेमार्फत कंत्राटी पद्धतीवर स्थानिक परिवहन सेवा चालविली जात आहे. एकूण ४८ पैकी सुमारे ३५ ते ४० बस एकूण १७ मार्गांवर चालविल्या जात आहेत. या बसमध्ये आजपर्यंत प्रवाशांना कागदी तिकीटे पंचिंग मशिनद्वारे दिली जात असली तरी त्याला तिलांजली देण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी कॅशलेस संकल्पना स्थानिक परिवहन विभागासाठी राबविण्यास सुरुवात केली. प्रवाशांना प्रवास करताना अनेकदा सुट्या पैशांअभावी वाहकासोबत वाद घालावा लागतो. त्यात काही वेळा वाहक सुट्या पैशांअभावी प्रवाशांना बसमधून मध्येच उतरवून दिले जाते.
सुट्यांपैशाअभावी मार्गस्थ झालेल्या बसमध्ये वाद होऊ नये, तसेच प्रवाशांना त्याच कारणास्तव बसमधून उतरावे लागू नये, यासाठी विभागाने थेट मोबाईलद्वारेच तिकीट विक्रीस सुरुवात केली. रिडल या मोबाईल अॅपद्वारे प्रवाशांना कॅशलेस तिकिटे देण्यास सुरुवात झाली असली तरी ती वातानुकूलित मार्गांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली आहे.
हे अॅप प्रवाशांना त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यातील वॅलेटमध्ये पैसे भरावे लागते. उर्वरित मार्गांवरील साध्या बसमधून प्रवासासाठी वाहकांकडून पंचिंग मशिनद्वारे प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. त्या मशिनला हद्दपार करून ईटीएम मशिनद्वारे तिकिट देण्याला रविवारपासून सर्वच बसमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्याची सुरुवात महापौरांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. त्यावेळी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृह नेता रोहिदास पाटील, परिवहन विभागाचे व्यवस्थापक विजयकुमार म्हसाळ, परिवहन उपव्यवस्थापक स्वाती देशपांडे आदी उपस्थित होते. त्यांनी ईटीएम तिकीट खरेदी करून काही अंतरावर प्रवास देखील केला. हे मशिन हाताळण्याचे प्रशिक्षण वाहकांना काही महिन्यांपासून देण्यास सुरुवात झाली होती. त्याचा मुहूर्त सतत तांत्रिक अडचणींत सापडल्याने अखेर त्याला शनिवारी सुरुवात करण्यात आली. या मशिनद्वारे वाहकाला पूर्वीच्या पंचिंग मशिनद्वारे देण्यात येणा-या तिकिटांचा हिशेब कार्यालयात मेमोद्वारे द्यावा लागत होता. त्याला ईटीएम मशिनमुळे बगल मिळाल्याने वाहकांना विक्री झालेल्या तिकिटांचा हिशेब या मशिनद्वारे अचूकपणे देता येणार आहे. याखेरीज तिकीट तपासणीसांना तिकिटांची तपासणी ईटीएमद्वारे त्वरित तपासणे सुलभ होणार असून, या प्रक्रियेत वेळेची मोठी बचत होणार असल्याने उत्पन्नवाढीत भर पडणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यासाठी पालिकेने एकूण ६० ईटीएम स्वाईप मशिन खरेदी केल्या आहेत. या मशिनला रिडल हा मोबाईल अॅप जोडून पूर्णता कॅशलेस तिकीट विक्री करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले.