मॅरेथॉन मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:47 AM2018-08-28T04:47:28+5:302018-08-28T04:47:58+5:30
ठाणे महापालिका प्रशासन लागले कामाला : पाऊस ठरतोय अडथळा
ठाणे : येत्या २ सप्टेंबर रोजी होणारी २९वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खड्डेमुक्त पार पडावी या उद्देशाने महापालिकेने विविध मार्गांनी ते बुजविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दिवसरात्र काम करून हे काम करण्यात येत असले तरी पावसाचा अडथळा निर्माण होत असल्याने खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेला काहीशी खीळ बसत आहे.
येत्या २ सप्टेंबर रोजी २९वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रंगणार आहे. दरवर्षी या स्पर्धेत २० ते २५ हजार स्पर्धक सहभागी होत असतात. त्यामुळे या स्पर्धकांना खड्डेमुक्त प्रवास करून ती स्पर्धा नियोजनबद्ध पार पडावी यासाठी शुक्रवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी खड्ड्यांची पाहणी केली असता, प्रत्येक मार्गावर त्यांना खड्डेच खड्डे दिसून आले. घोडबंदरचा सर्व्हिस रस्ता तर पूर्णपणे उखडला असून काही ठिकाणी पाण्याच्या वाहिन्या फुटून केबल वर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवर स्पर्धकांनी धावायचे कसे, असा सवालच करून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच या मार्गावरील वागळे डेपो, साठेनगर, इंदिरानगर चौक, सावरकर नगर, कोरस चौक, रुनवाल, देवदया ते नीलकंठ, पोखरण रोड नं. २, मानपाडा सेवा रस्ता, हिरानंदानी इस्टेट प्रवेशद्वार आदी सर्वच ठिकाणी खड्ड्यांचे जाळे पसरले आहे.
दरम्यान, आता शनिवारपासून लागलीच खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. घोडबंदर सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे काही वेळेसाठी येथील रस्ता बंद ठेवला होता. तसेच इतर मॅरेथॉन मार्गांवरील इतर ठिकाणचे खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे.
परंतु, पावसाचा अडसर येत असल्याने पालिकेची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. रस्ते बुजविताना काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रिट, डांबराचा वापर केला जात आहे. मॅरेथॉन स्पर्धेपूर्वी ते बुजविले जातील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
खड्डे भरण्यासाठी आयुक्त पुन्हा रस्त्यावर
च्सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मुंब्रा बायपास बंद झाल्याने शहरातील वाहतुकीवर जास्तीचा ताण आला आहे.
च्तसेच पावसाने सुद्धा उघडीप न घेतल्याने खड्डे बुजविण्यास विलंब होत आहे. परंतु आता मॅरेथॉन स्पर्धा असल्याने खड्डे बुजविण्याची प्रक्रिया वेगात सुरू केल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.
च्खड्डे बुजविण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञांनाचा वापर केला जात आहे. अमेरीकन तंत्रज्ञानाचा वापर हा प्रायोगिक तत्त्वावर केला गेला आहे. तो यशस्वी झाला तर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.