नियोजित भाईंदर पश्चिम ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात; पश्चिम महामार्गावरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 07:45 PM2019-01-16T19:45:07+5:302019-01-16T19:46:32+5:30
पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वे स्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.
- राजू काळे
भाईंदर - पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वे स्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. हा लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील वाहतुकीतून सुटका होणार असल्याचे एमएमआरडीएच्या सूत्राकडून सांगण्यात आले.
या लिंक रोडचे नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएचं काम पाहणार असून, एमएमआरडीएकडूनच रोडच्या बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे. रोडचे काम मात्र मीरा-भाईंदर महापालिकेकडून केले जाणार आहे. हा रस्ता भाईंदर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गाला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे जोडला जाणार आहे. तेथील राधास्वामी सत्संग व मिठागरापासून पुढे तो मीरा रोड रेल्वे स्थानकाकडे जाऊन दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथून निर्गमित होणार आहे. या रोडचे अंतर सुमारे ५ ते ६ किलोमीटर इतके असून, त्याची रुंदी सुमारे ४५ ते ६० मीटर इतकी असणार आहे. त्यासाठी सुमारे ३०० ते ३५० कोटींचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी किमान २ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असला तरी तो भविष्यातील तांत्रिक अडचणींमुळे वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या रोडचे बांधकाम पूर्ण झाल्यास भाईंदर पूर्व व पश्चिमेकडील वाहतुकीला पर्याय उपलब्ध होऊन भाईंदर ते दहिसर दरम्यानचे मोठे अंतर कमी होणार आहे. यामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार असल्याने हा रोड भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र या नियोजित रोडच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात तिवरक्षेत्र असल्याने त्याच्या बांधकामात अडसर निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा अडसर पर्यावरण विभागाच्या परवानगीनेच दूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या रोडच्या लगतच भाईंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते वसई येथे खाडीमार्गे जाणारा आणखी एक लिंक रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित लिंक रोडला नियोजित भाईंदर पश्चिम ते दहिसर पश्चिम लिंक रोड जोडला जाणार असल्याने वसई-विरार येथील वाहतुकीला देखील मुंबईकडे जाण्यासाठी हा रोड महत्वाचा पर्याय ठरू शकणार आहे. याखेरीज भाईंदर पश्चिम ते वसई किल्ल्यादरम्यान रो-रो सेवेच्या जेट्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने वसई-विरार ते मुंबईचे अंतर खूपच कमी होऊन मुंबई-अहमदाबाद महामार्गासह पश्चिम महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुसह्य होणार आहे.
तसेच पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होऊन ती जलद होणार आहे. नियोजित भाईंदर ते दहिसर लिंक रोडवर टोलच्या धाडीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील टोलधाडीतून सुटका करुन घेण्यासाठी नियोजित लिंक रोडच्या वापरात सतत वाढ होणार आहे. हा रोड ६ ते ८ पदरी बांधण्यात येणार असल्याने यावरील वाहतूक कोंडी नगण्य ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाकांक्षी ठरणाऱ्या या लिंक रोडला एमएमआरडीए प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या लिंक रोडचा वापर मीरा रोड येथील लोकांना करता यावा, यासाठी मीरा रोड पूर्व व पश्चिम बाजू जोडणाऱ्या उड्डाणपुलाची मागणी आ. नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएकडे केली होती. मात्र तेथे लोकवस्ती नसल्याच्या कारणास्तव सध्या त्या पुलाला एमएमआरडीएने तत्कालीन बैठकीत लाल दिवा दाखविला आहे.