जिल्हा रुग्णालयाच्या शवागार यंत्रणेच्या कामाला अखेर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:54 PM2018-10-23T23:54:30+5:302018-10-23T23:54:41+5:30

जिल्हा रुग्णालयाच्या शवागारामधील मृतदेहांची संख्या वाढल्याने तेथील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली.

The beginning of the work of the civil administration of the civil hospital | जिल्हा रुग्णालयाच्या शवागार यंत्रणेच्या कामाला अखेर सुरुवात

जिल्हा रुग्णालयाच्या शवागार यंत्रणेच्या कामाला अखेर सुरुवात

Next

ठाणे : जिल्हा रुग्णालयाच्या शवागारामधील मृतदेहांची संख्या वाढल्याने तेथील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर दोन दिवसांत येथील मृतदेह संबंधित यंत्रणांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने ती संख्या मंगळवारी दुपारपर्यंत ५ वर आली. त्यामुळे तेथील वातानुकूलित यंत्रणेच्या कामाला सुरुवात झाली. यापुढे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेह ७ दिवसात ताब्यात घ्यावे, अन्यथा दुसरे मृतदेह न घेण्याचा पवित्रा ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा रुग्णालय शवागारात मृतदेह ठेवण्याची क्षमता सध्याच्या घडीला अवघी १२ इतकी आहे. येथे ठाणे ग्रामीण, पालघर तसेच शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून मृतदेह आणले जातात. त्यातच मध्यंतरी काही यंत्रणांनी मृतदेह ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे मृतदेहांची संख्या दुप्पट, तिप्पटवर गेली. या वाढत्या मृतदेहांचा परिणाम वातानुकूलित यंत्रणेवर होऊन यंत्रणा अचानक ठप्प पडली. शवागारात थंडावा राखण्यासाठी अद्याप बर्फांच्या लाद्यांचा वापर केला जात आहे. जोपर्यंत शवागारातील मृतदेह जात नाहीत, तोपर्यंत तिथे दुरूस्तीचे काम करता येण्यासारखे नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पोलीस यंत्रणेच्या मागे लागून ते मृतदेह ताब्यात देण्यास सुरुवात केली.
>५ ते ७ दिवसांत मृतदेह हलवा
भविष्यात पुन्हा असे संकट ओढवू नये, यासाठी वातानुकूलित यंत्रणेची नवीनच कॉइल टाकावी, अशी सूचना रुग्णालय प्रशासनाने केली. शवागारात मृतदेह ठेवण्याची क्षमता कमी असल्याने शवविच्छेदनानंतर एखादा मृतदेह कमीत कमी ५ ते ७ दिवसांत घेऊन जाण्याबाबत संबंधितांना सूचना करणार आहेत. संबंधित यंत्रणांनी सहकार्य केले नाही तर, जोपर्यंत पहिला मृतदेह नेला जात नाही, तोपर्यंत त्या संबंधित यंत्रणेकडून दुसरा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेण्याचा विचार रुग्णालय प्रशासन करीत आहे. या बाबत आताच कठोर पावले उचलण्याची वेळ आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: The beginning of the work of the civil administration of the civil hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.