वाल्मीकी समाजाचे उपोषण मागे: डुकराच्या कत्तलीमुळे संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:37+5:302021-09-02T05:28:37+5:30
ठाणे : वाल्मीकी समाजाने पवित्र मानलेल्या डुकराची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषणाचे ...
ठाणे : वाल्मीकी समाजाने पवित्र मानलेल्या डुकराची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषणाचे आंदोलन बुधवारी सायंकाळी मागे घेतले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट, रामनगर, साठेनगर भागातील वाल्मीकी समाजातील एका कुटुंबाने श्रद्धेपोटी डुकराला देवासाठी सोडले होते. परंतु, बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी कोणीतरी त्याची हत्या केल्याचे आढळले. हा प्रकार समजताच वाल्मीकी समाजातून संताप व्यक्त करण्यात आला. हे दुष्कृत्य करणाऱ्यांवर कारवाईसाठी समाजाचे कार्यकर्ते सुरेंद्र भुंबक, सुभाष भुंबक आणि नगरसेवक राजकुमार यादव आणि आरपीआयचे सुरेश कांबळे आदींनी डुकराची हत्या झालेल्या ठिकाणीच टीएमटी वागळे इस्टेट आगारासमोरील वाल्मीकीपाडा येथे सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उपोषणाच्या आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, संबंधितांविरुद्ध कारवाईचे आश्वासन श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलकांनी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आंदोलन मागे घेतले.