जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवा; अंनिसच्या प्रशिक्षणार्थींना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:48 AM2018-07-25T02:48:49+5:302018-07-25T02:49:25+5:30
जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवा. प्रत्येक घटनेची चिकित्सा करा, नंतर अनुमान काढा, असा कानमंत्र मान्यवरांनी दिला.
ठाणे : तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा तपासा, आत्मविश्वासाने स्वत:चे विचार बिनधास्तपणे मांडा, वैज्ञानिक दृष्टीचा अंगीकार, प्रचार-प्रसार सांगताना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, असा सल्ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण संवाद शिबिरात देण्यात आला. जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवा. प्रत्येक घटनेची चिकित्सा करा, नंतर अनुमान काढा, असा कानमंत्रही मान्यवरांनी दिला.
रविवारी मो. ह. विद्यालय येथे एक दिवसाचे शिबिर झाले. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यकर्ते अरुण रणदिवे यांनी श्रद्धा अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टीकोन, देवी अंगात येणे, भुताने झपाटणे, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, ‘अंनिस’ ची व्यापक वैचारिक भूमिका या विषयांची शिबिरार्थींना तोंड ओळख करून दिली. त्यानंतर ‘अंनिस’ ची देव आणि धर्म विषयक भूमिका समजावून सांगितली. प्रा. डॉ. सुहास शिंगारे यांनी फलज्योतिष हे शास्त्र का नाही? हा विषय त्यांच्या मिश्कील शैलीत मांडला. मन, मनाचे आजार आणि मनाचे आरोग्य याबद्दल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सुजित रणदिवे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मानसिक आरोग्य व ‘अंनिस’ च्या ‘विज्ञान, निर्भयता निती’ या सूत्रची सांगड घालून दिली. शिबिरार्थींना अंनिसच्या कार्याची आवश्यकता, महत्त्व तसेच हे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याकरिता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांसाठी प्रोत्साहीत केले.
६९ जणांनी घेतला शिबिरात भाग
समितीच्या वंदना शिंदे यांनी काही निवडक, प्रातिनिधिक चमत्कार, ‘अंनिस’ ची प्रबोधनपर गाणी व कार्यक्र माच्या प्रास्ताविकाची तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. या शिबिरात एकूण ६९ शिबिरार्थींनी भाग घेतला होता.
श्रीपाद आगाशे, अशोक चव्हाण, अॅड. अरविंद फडके, डी. जे. वाघमारे, राजू कोळी आदी उपस्थित होते. स्वप्नील शाहू याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील शाहीर एस. एस. शिंदे लिखित गीत तसेच, ‘कॉलेजच्या बाकावर’ ही स्वरचित कविता त्यांनी सादर केली.