कोविड अर्थसाहाय्याचे १४,९६२ रिक्षाचालक लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:34+5:302021-07-21T04:26:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोविड काळातील निर्बंधांमुळे राज्य शासनाने मे महिन्यात रिक्षाचालकांना १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोविड काळातील निर्बंधांमुळे राज्य शासनाने मे महिन्यात रिक्षाचालकांना १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. यासाठी कल्याण आरटीओमध्ये आतापर्यंत २४ हजार २७२ रिक्षाचालक मालकांनी अर्ज केले असून, त्यापैकी १४ हजार ९६२ रिक्षाचालक या मदतीचे लाभार्थी झाले आहेत.
रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी नोंदणी, कागदपत्रांच्या छाननीचे काम सुरू आहे. आतापर्यंत दोन, अडीच महिन्यांत आलेल्या अर्जांमध्ये सुमारे साडेसहा हजार अर्ज नामंजूर, रद्द झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता न करणे, तसेच तेचतेच अर्ज पुन्हा येणे यासह अन्य विविध तांत्रिक कारणांमुळे ते अर्ज रद्द, बाद झाले असल्याची तांत्रिक माहिती समोर आली आहे. आताही २ हजार १८९ अर्ज विचाराधीन असून, त्यांना लवकरच अर्थसाहाय्य मिळणार असल्याचे सांगण्यात आले. २४७ अर्जांवर काम होणे बाकी असून, लवकरच ते अर्जदेखील मार्गी लागतील, असेही सांगण्यात आले.
-------
राज्य शासनाच्या अर्थसाहाय्याचे जे रिक्षाचालक, मालक लाभार्थी आहेत, त्यापैकी हजारो जणांना तो लाभ मिळाला आहे. जे तांत्रिक बाबींमुळे रद्द, नामंजूर झाले, त्याबाबत लगेचच संबंधितांना सांगण्यात येते. नवे अर्ज येतात त्यावर काम सुरू आहे. शासन निकषानुसार जेवढे लाभार्थी असतील त्यांना ते मिळवून देण्यासाठी आमचे अधिकारी, कर्मचारी सातत्याने कार्यमग्न आहेत. तांत्रिकदृष्ट्या जे अर्ज योग्य असतील, त्यांना तत्काळ लाभ मिळण्यासाठी आमचा प्रयत्न असतो.
तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण