भाजीपाला उत्पादनाचा कालावधी बदलल्याने फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:42 PM2020-02-24T23:42:31+5:302020-02-24T23:42:39+5:30
विविध भाजीपाल्यांची लागवड; काकडी, मिरचीसोबतच कारल्याचेही घेतले उत्पादन
- जर्नादन भेरे
भातसानगर : यंदा शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काकडीचे उत्पादन आले होते. मात्र, भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या काकडीच्या पिकावर अक्षरश: नांगर फिरवला होता. असे असले तरी तालुक्यातील सारमाळ येथील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी कालावधी बदलून काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात पिकणाºया काकडीला चांगला भाव मिळत आहे.
पती मंगेश पाटील यांच्या साथीने मनीषा या सात एकर शेतजमिनीत भाजीपाला पीक घेत आहेत. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.
पाटील यांनी कारली, अंतरपीक मिरची व झेंडूची फुले आणि दोन एकरमध्ये सिमला मिरचीची लागवड केली आहे. दिवसाआड ९०० किलो मिरची बाजारात विक्रीसाठी जाते, तर ८०० ते ९०० किलो काकडी १२ ते १४ रु पये दराने बाजारात विकली जात आहे. हीच काकडी काही दिवसांपूर्वी दोन रु पये किलोने जात होती. दीड फुटांपर्यंतच्या कारल्याचे उत्पादन त्या घेत असून अंतरपीक मिर्चीतूनही त्यांना एक ते दीड लाखांचा नफा अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात काकडीच्या अधिक उत्पादनामुळे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी काकडी उपटून फेकून देण्याची वेळ आली होती. मात्र, कालावधी बदलून घेतलेल्या काकडी आणि मिरचीच्या उत्पादनातून दोन ते अडीच लाखांपर्यंत नफा मिळण्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सेंद्रिय खतांमुळे शेतातच उठाव
सर्वच शेतात ठिबकच्या सहाय्याने लागवड केली आहे. तसेच सेंद्रिय खतांची जोड दिल्याने या हिरव्यागार भाजीपाल्याला शेतातच मागणी मिळत असल्याचे मनीषा पाटील यांनी सांगितले. केवळ एकाच प्रकारच्या भाजीपाल्याच्या उत्पादनावर अवलंबून न राहता शेती केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाच्या उत्पादनामुळे एखाद्या पिकाला भाव मिळाला नाही तरी दुसºया पिकातून ते भरून काढण्याची संधी शेतकºयांना मिळत आहे.
- विलास झुंजाराराव, कृषी अधिकारी