गुन्हयांचा उत्कृष्ठ तपास: दोष सिद्धीसाठी कामगिरी बजावणाऱ्या ११२ पोलिसांचा ठाण्यात सत्कार
By जितेंद्र कालेकर | Published: March 28, 2019 09:57 PM2019-03-28T21:57:26+5:302019-03-28T22:19:35+5:30
अनेकदा उत्कृष्ठपणे तपास करुनही न्यायालयात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण हे नगण्य असते. त्यामुळे अनेक आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे गुन्हयाच्या तपासापासून दोष सिद्ध होण्यापर्यंत प्रामाणिकपणे मेहनत घेऊन चांगली कामगिरी बजावणाऱ्या ११२ पोलीस अधिकाऱ्यांचा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सत्कार करुन अभिनव उपक्रम राबविला.
ठाणे: खून, लैंगिक अत्याचार, फसवणूकीसह इतरही गुन्हयांचा उत्कृष्ठपणे तपास करुन आरोपींच्या दोष सिद्धीसाठी विशेष कामगिरी बजावणा-या ठाणे शहर आयुक्तालयातील ११२ पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांचा मंगळवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी विशेष सत्कार केला. येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहामध्ये आयोजित एका कार्यक्रमात आयुक्तांनी हा गौरव केला.
यावेळी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, सत्यनारायण चौधरी तसेच सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांमधील तपास अधिकारी यांच्या गुन्हयांचा उत्कृष्ट आणि गुणात्मक तपास, स्वकौशल्य, व्यावसायिक निपुणता दाखवून चांगले पुरावे न्यायालयात दाखल केल्यामुळे तसेच सुनावणी दरम्यान योग्य समन्वय राखून उल्लेखनीय कामगिरीमुळे अशा गुन्हयांमध्ये आरोपींवर आरोप शाबीत होणे शक्य होत असते. अशा अत्यंत प्रामाणिक आणि सचोटीच्या कामाचा पोलीस आयुक्त फणसळकर यांनी गुणगौरव केला. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे अधिकाधिक गुन्हयांमध्ये दोषसिद्धी होण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहित केले. विविध न्यायालयांमध्ये जुलै २०१८ ते जानेवारी २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या खटल्यांमध्ये आरोपींवर आरोप सिद्ध झाले. अशा खटल्यांमधील पोलीस तपास अधिकारी, न्यायालयीन कामकाज कर्मचारी तसेच मार्गदर्शक म्हणून संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचाही फणसळकर यांनी स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
गौरवास्पद कामगिरी करणारे अधिकारी: पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने (भोईवाडा) अपहरण, बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. पोलीस निरीक्षक निलेश करे (मुंब्रा) यांच्याकडील खूनाच्या तपासामध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. दत्तात्रेय पांढरे (महात्मा फुले चौक) खूनाचा प्रयत्न आरोपीस आजन्म कारावास. पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली (कापूरबावडी) अपहरण, बलात्कार प्रकरणात आरोपीला आजन्म कारावास. डी. डी. टेळे (वर्तकनगर) खूनातील आरोपीला आजन्म कारावास. मुरलीधर कारकर (कळवा) बलात्कारातील आरोपीला दहा वर्षे कारावास. सहायक पोलीस निरीक्षक (मुंब्रा) लैंगिक अत्यारातील आरोपीला दहा वर्षांची शिक्षा. रविदत्त सावंत (वर्तकनगर) लैंगिक अत्चाराच्या आरोपीला दहा वर्षेय सश्रम कारावास.रविंद्र दौंडकर (कोपरी) अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गक आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा. तसेच कासारवडवली वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक अनुजा घाडगे- राजगुरु महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना त्यांनी केलेल्या चोरीच्या तपासातील गुन्हयात आरोपीला तीन वर्षांची शिक्षा झाली. दोष सिद्धीसाठी प्रमाणपत्र मिळविणाºया त्या एकमेव महिला अधिकारी ठरल्या आहेत.
चौकट
खून व लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत दाखल झालेल्या दोन गंभीर गुन्हयांमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली असून एका गुन्हयात जन्मठेप झाली आहे. खून, खूनाचा प्रयत्न तसेच लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या पाच गुन्हयात अजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. सहा गुन्हयांमध्ये दहा वर्षे, एका गुन्हयात नऊ वर्ष, अन्य एका गुन्हयात आठ तर पाच गुन्हयांमध्ये सात वर्ष कारावासाची शिक्षा झाली आहे.
.................
सर्वाधिक खटले दोष सिद्ध झालेल्या पोलीस ठाण्यांमधून सत्र न्यायालयातील कामगिरीचे मूल्यांकन करुन मुंब्रा, मानपाडा आणि भोईवाडा या तीन पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-यांना गौरविण्यात आले. तर प्रथम वर्ग न्यायालयातील कागगिरीच्या मूल्यांकनानुसार मानपाडा, महात्मा फुले चौक, वर्तकनगर, कोळसेवाडी आणि श्रीनगर या पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस अधिका-यांना सन्मानित करण्यात आले.