बुडणाऱ्यांना वाचवणाऱ्या कौस्तुभ तारमाळेला मरणोत्तर सर्वोत्तम जीवनरक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 02:31 AM2019-06-01T02:31:22+5:302019-06-01T02:31:39+5:30
भातसा नदीच्या वाहत्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच मुले खोल नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात अडकली व बुडू लागली.
ठाणे : पाण्यात बुडणाऱ्या मुलांचे प्राण वाचवताना कौस्तुभ भगवान तारमाळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्यास केंद्र शासनाचे ‘सर्वोत्तम जीवनरक्षापदक’ मरणोत्तर जाहीर झाले होते. हे पदक त्याची आई रत्नप्रभा तारमाळे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व कुटुंबकल्याण तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानपत्र, पदक व दोन लक्ष रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. १२ मे २०१८ रोजी खडवली (कासणे) येथील भातसा नदीत पोहण्यासाठी सात मुले खोल गेली होती. भातसा नदीच्या वाहत्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच मुले खोल नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात अडकली व बुडू लागली. हे भातसा नदीच्या किनाºयावर उभ्या असलेल्या कौस्तुभ (२४ रा. मौजे-शेई, ता. शहापूर) याने पाहिले व क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी मारून त्या मुलांचे प्राण वाचवले. मात्र, बुडणाऱ्या मुलांना वाचवताना शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे कौस्तुभ यांचा मृत्यू झाला होता.
या पुरस्कारावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधव, आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, आमदार गणपत गायकवाड, जिल्हा पालक सचिव सतीश गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी अंकुश माने उपस्थित होते. याप्रकरणी कौस्तुभ तारमाळे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी केंद्र शासनाच्या जीवनरक्षापदक पुरस्कार २०१८ साठी त्यांचा प्रस्ताव विहित नमुन्यात गृह विभाग महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडील पत्रान्वये कौस्तुभ याची २०१८ साठी जीवनरक्षापदक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हे शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या आईस प्रदान करण्यात आले.