बेथल चर्च रस्त्याचे रखडलेले काम अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:13 PM2020-02-03T23:13:28+5:302020-02-03T23:13:49+5:30
बदलापूर : अंबरनाथमध्ये ज्या पाच मुख्य रस्त्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निधीची तरतूद केली आहे, त्यातील बेथल ...
बदलापूर : अंबरनाथमध्ये ज्या पाच मुख्य रस्त्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निधीची तरतूद केली आहे, त्यातील बेथल चर्च रस्त्याचे काम रखडले होते. याठिकाणी असलेल्या इमारतींचे बांधकाम या रस्त्याच्या आड येत होते. त्यातील सहा मालमत्ताधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्याने अडचणीत वाढ झाली होती. पालिकेने रस्त्याचे काम रखडणार नाही, या अनुषंगाने तोडगा काढला. १८ मीटरऐवजी सध्या १२ मीटर रस्त्याचे काम करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे वर्षभरापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शहरातील पाच मुख्य रस्त्यांसाठी एमएमआरडीएने ५५ कोटींची आर्थिक तरतूद केली होती. त्यातील पाच कोटींची तरतूद ही अंबरनाथ पश्चिम भागातील बेथल चर्च ते फुलेनगर रस्त्यासाठी करण्यात आली होती. या रस्त्याचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात येणार होते. हे काम रखडल्याने पूर्ण रस्ता होण्यास विलंब झाला आहे. त्यातच, या रस्त्याआड अनेक निवासी घरेही येत असल्याने त्यांना हटवणे पालिकेला त्रासदायक होत होते.
विकास आराखड्यात हा रस्ता १८ मीटर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, संपूर्ण रस्त्यावर पालिकेने मार्किंगही केले होते. या मार्किंगमध्ये पालिकेने मंजुरी दिलेल्या इमारतींचाही भाग जात होता. त्यामुळे या मार्किंगला सहा मालमत्ताधारकांनी तीव्र विरोध केला. त्या रस्त्याच्या रुंदीकरणाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना न्यायालयीन बाब पुढे येत असल्याचे लक्षात आल्याने आता पालिकेने रस्त्याचे काम उरकण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.
एमएमआरडीएच्या तंबीनंतर काम रुळांवर
गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचा घोळ सुरू होता. त्यातच, एमएमआरडीएने ३१ जानेवारीपर्यंत पालिकेने रस्त्याच्या मार्किंगनुसार नकाशा न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा दिला होता. अखेर, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या तंबीला घाबरून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी १२ मीटर रस्त्याचा नकाशा मंजूर करून त्यानुसार रस्त्याचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेतल्याने न होणारे काम किमान रुळांवर आले आहे. १८ मीटर रस्त्याचा मोह बाजूला ठेवत पालिकेने आता १२ मीटर रस्त्याचे काम उरकण्यास सुरुवात केली आहे.