‘बेटी बचाव’चा १३,५०० मुलींना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 02:27 AM2018-06-17T02:27:42+5:302018-06-17T02:27:42+5:30
ठाणे महापालिकेने बेटी बचाव बेटी पढाव, असा नारा दिला आहे. त्यानुसार, शहरातील ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल आणि ज्यांनी दोन मुलांचा नियम पाळला असेल, त्यांच्यासाठी राजमाता जिजाऊ बेटी बचाव बेटी पढाव, ही योजना पुढे आणली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेने बेटी बचाव बेटी पढाव, असा नारा दिला आहे. त्यानुसार, शहरातील ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल आणि ज्यांनी दोन मुलांचा नियम पाळला असेल, त्यांच्यासाठी राजमाता जिजाऊ बेटी बचाव बेटी पढाव, ही योजना पुढे आणली आहे. त्यानुसार, अशा मुलींच्या जन्मापासून लसीकरण, शालेय शिक्षण, पदवी व विवाह अशा विविध स्तरांवर आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील मुलांचा वार्षिक जन्मदर लक्षात घेऊन यंदा या योजनेंतर्गत १३ हजार ५०० मुलींना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर हा साधारणपणे ९५० ते ६० च्या आसपास आहे. त्यामुळे तो वाढवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे प्रयत्न सुरू आहेत. आता तो वाढवण्याबरोबरच त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी महापालिकेने ही योजना पुढे आणली आहे.
महापालिका क्षेत्रात वार्षिक साधारणपणे २७ हजार मुले जन्माला येतात, त्यापैकी ५० टक्के म्हणजे १३,५०० मुलींना ही योजना लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक टप्प्यावर पाच हजार याप्रमाणे एका मुलीला तिच्या जन्मापासून विवाहापर्यंतच्या कालावधीत २५ हजार आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत व उत्तम आरोग्य, शिक्षण यास आधार मिळेल आणि मुलींचा जन्मदरदेखील वाढेल, अशी आशा पालिकेला आहे. त्यासाठी चार कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
>२० हजार किशोर मुलींना देणार रुबेला लस
ठाणे महापालिकेच्या शाळांतील अंदाजे १० हजार व खाजगी शाळांतील अंदाजे १० हजार अशा एकूण २० हजार मुलींना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रुबेला लस देण्याचा निर्णयदेखील पालिकेने घेतला आहे. यासाठी एक कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.