राज्य सरकारकडून ओबीसी समाजाचा विश्वासघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:08+5:302021-09-16T04:50:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाविकास आघाडी सरकारकडून महावसुली सुरू असून, ओबीसी व मराठा समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाविकास आघाडी सरकारकडून महावसुली सुरू असून, ओबीसी व मराठा समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजप ओबीसी जनतेच्या पाठीशी आहे. आगामी निवडणुकीत सर्व जागांवर ओबीसी समाजातील उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती बुधवारी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आ. डावखरे व आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका येथे आंदोलन करण्यात आले. मागील सहा महिन्यांपासून राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणासंदर्भांत टोलवाटोलवी सुरू आहे. ओबीसी समाजाचा इम्परिकल डेटा जमा करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारंवार सुचिवले होते. मात्र, सरकारने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. इम्परीकल डेटा जमा करण्यात ढिलाई दाखविली. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय पाच जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत, याकडे केळकर यांनी लक्ष वेधले.
या वेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात ठामपातील गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संजय वाघुले, कृष्णा पाटील, प्रतिभा मढवी, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी आदी सहभागी झाले होते.
-------------------