निवडणूक आयोगाकडून लाेकशाहीचा विश्वासघात; भास्कर जाधव यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 07:12 AM2023-02-27T07:12:29+5:302023-02-27T07:12:49+5:30
मुख्यमंत्र्यांवरही केला हल्लाबाेल शिवसेना या मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले आणि ज्यांनी पक्षातून बंडखोरी आणि गद्दारी केली, त्यांना ते देण्यात आले. अशी घटना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीच घडली नव्हती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बाळासाहेबांनी देव म्हणून पूजलेला धनुष्यबाण निवडणूक आयोगाने चोरांच्या हाती दिला आहे. आयोगाने घटनेचा, लोकशाहीचा आणि शिवसेनेचाही विश्वासघात केला. सरकारी यंत्रणा, स्वायत्त संस्था बटिक झाल्या असून, न्याय मिळवण्यासाठी नागरिकांच्या न्यायालयात जाऊ. जनता जनार्दनच आता न्याय देईल, असा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रविवारी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवगर्जना मेळावा झाला. खा. अरविंद सावंत, खा. राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी मिळणार आहे. आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करा, असे भाजपचे लोक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकाल येण्यापूर्वीच सांगत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला असला तरी हा निकाल कोणत्या तरी पक्षाच्या कार्यालयातून लिहून आला आहे.
शिवसेना या मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले आणि ज्यांनी पक्षातून बंडखोरी आणि गद्दारी केली, त्यांना ते देण्यात आले. अशी घटना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीच घडली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला, तेव्हा काँग्रेस पक्षावर किंवा चिन्हावर आपला हक्क सांगितला नाही. त्यांनी शिवसैनिकांना खचून जाऊ नका, असा सल्लाही दिला. एकनाथ शिंदे आणि माझे वैयक्तिक भांडण नाही; पण ही लढाई तत्त्वांची आहे. तत्त्वांच्या लढाईत सख्खा भाऊ जरी आला तरी त्याला सोडता कामा नये, असे धर्मशास्त्र सांगते, असेही ते म्हणाले.