खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिक चांगल्या सुविधा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
By सुरेश लोखंडे | Published: August 30, 2023 02:23 PM2023-08-30T14:23:39+5:302023-08-30T14:26:44+5:30
सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ...
सुरेश लोखंडे, ठाणे: जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन खेळाडूंसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईल, असे सांगून यावर्षी विशेष प्राविण्यप्राप्त १० खेळाडूंचे सत्कार करण्याचे भाग्य लाभले,मात्र पुढील वर्षी २० खेळाडूंचे सत्कार करण्याचे भाग्य लाभो. त्यासाठी असेच खेळत राहा अन् ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, अशी सदिच्छा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केली.
क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त ठाणे जिल्ह्यातील मार्गदर्शक व खेळाडूंचा शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात शाल व सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार शिनगारे यांनी व्यक्त करुन जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
खेळाडू घडताना त्या खेळाडूच्या जिद्दीसोबत त्याच्या पालकांचा पाठिंबा आणि शासनाचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मी मानतो. ठाणे जिल्ह्यातील भावी खेळाडूंना शासकीय सुविधांची जोड मिळाल्यास आणखी प्रतिभावंत खेळाडू निर्माण होतील आणि यासाठी सर्व प्रकारची मदत जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल, असं आश्वासन देऊन खेळाडूंकडून असलेल्या अपेक्षाही शिनगारे यांनी व्यक्त केल्या.
या सत्कार सोहळ्याची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या देखण्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, राज्य क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने, तालुका क्रीडा अधिकारी रुही शिंगाडे आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाचे रंगनाथ डुकरे आदी उपस्थित होते.
सन्मानित मार्गदर्शक व खेळाडूंची नावे-
सन २०१९-२०चा जीवनगौरव पुरस्कार- बॅडमिंटन- श्रीकांत शरदचंद्र वाड
सन २०१९-२० चा क्रीडा मार्गदर्शक- कबड्डी- प्रशांत परशुराम चव्हाण
खेळाडू-
1. सन २०१९- २० - चे - पॉवर लिफ्टिंग - नाजूका तातू घारे,
शुटिंग: भक्ती भास्कर खामकर,
कबड्डी: सायली उदय जाधव (सध्या तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत)
2. २०२०-२१ चे - कबड्डी - निलेश तानाजी साळुंके,
खो-खो- प्रियांका पंढरी भोपी,
टेबल टेनिस- सिद्धेश मुकुंद पांडे,
3. २०२१-२२ चे -
पॉवर लिफ्टिंग- साहिल मंगेश उतेकर,
मैदानी खेळ- प्रणव प्रशांत देसाई