भिवंडीत आयपीएलवर सट्टा लावणे तरुणाला पडले महागात; सात लाख लुबाडले
By नितीन पंडित | Published: April 11, 2023 07:11 PM2023-04-11T19:11:23+5:302023-04-11T19:11:33+5:30
पाच जनांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी: आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळण्यास भाग पाडून त्यामध्ये सात लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अंजूर फाटा येथील जैनम रमणीकलाल मारु याने आपल्या परीचीता कडून व्यवसायासाठी सात लाख रुपये उधार घेतले होते.त्याच दरम्यान त्याने ऑनलाईन सट्टा लॉटरी खेळवणारे राजेंद्र पवार व रुपेश माळी यांच्या अजंता कंपाऊंड येथील कार्यालयात गेला. त्याठिकाणी ३१मार्च ते ७ एप्रिल दरम्यान टी.व्ही.वर आयपीएल क्रिकेट मॅच सुरु असताना राजेंद्र पवार, रुपेश माळी व आश्विन देवरकोंडा यांनी क्रिकेटमध्ये बेटींग करुन खुप पैसे कमवशिल असे अमिश दाखवुन क्रिकेट मॅचवर सटटा खेळण्यास जैनम यास प्रोत्साहीत करून लोटस बुकच्या युझर आयडीच वापर करून फनस्पोटर्स नावाच्या एप्लिकेशन्स वरील रौलेट नावाचा जुगारात पैसे टाकायला लावले. पैसे हरल्यावर अजून अधिक पैसे लावून जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत तब्बल सात लाख रुपये उकळून जुगार खेळण्यास भाग पाडले.
परंतु सतत हरल्याने जैनम मारू याने गेम बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता बुकी गेमच्या एप्लिकेशन्स त्यामधील सॉफ्टवेअर च्या मदतीने नियंत्रीत करुन पैसे लावणाऱ्या ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचे समजल्याचे लक्षात आल्याने जैनम मारू याने थेट भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या समोर आपली कैफियत मांडली.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येताच पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी नियंत्रण कक्ष येथील सहायक पोलीस निरीक्षक विजय कोळी,निजामपुरा पोलीस ठाण्यातील सपोनि अमोल दाभाडे व कोनगाव पोलीस ठाणे येथील सपोनि किरण वाघ यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यांनी मध्यरात्री घटनास्थळी छापा टाकला असता तेथे आरोपी राजेंद्र पवार, रुपेष माळी हे सट्टा खेळवत असल्याचे दिसून आले .पोलिसांनी घटनास्थळा वरून ९० हजार रोख व मोबाईल, कॉम्पुटर असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत राजेंद्र मारुती पवार,रुपेश प्रकाश माळी, विमल दिलीप जाकरीया,अश्विन हनुमंत देवरकोंडा,हेपल पटेल यांच्या विरोधात जुगार व क्रिकेट बेटींग इंटरनेटच्या माध्यमातून खेळवून ७ लाख रुपयाची फसवणुक केल्या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.