सावधान! जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या बनावट वेबसाईट्सचा सुळसुळाट
By सुरेश लोखंडे | Published: March 31, 2023 07:16 PM2023-03-31T19:16:18+5:302023-03-31T19:17:33+5:30
"बनावट, फसव्या संकेतस्थळाकडून फसवणूक होणार नाही, यासाठी शासनाचे crsorgi.gov.in हे संकेतस्थळ लाभार्थांनी वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले."
ठाणे : अनेक सार्वजनिक माध्यमातून जन्म, मृत्यू प्रमाणपत्राच्या वाटपाबाबत लोकांमध्ये अफवा पसरवली जात आहे. या प्रमाणपत्राच्या कामासाठी खाजगी संस्थांकडून अनेक बनावट संकेतस्थळ तयार करून सामान्यांकडून मनमानी शुल्क वसूल केली जात आहे. या फसवणुकीला टाळण्यासाठी ठाणेजिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच बैठक घेण्यात आली. त्यात जन्म,मृत्यूच्या नाेंदणीसाठी जिल्हा परिषदेने याेग्य पावले उचलण्याची गरज आहे, तसेच बनावट, फसव्या संकेतस्थळाकडून फसवणूक होणार नाही, यासाठी शासनाचे crsorgi.gov.in हे संकेतस्थळ लाभार्थांनी वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या जन्म, मृत्यू नोंदणी समितीच्या सभेसाठी जिल्हाधिका-यांसह जि.पत्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आदींची उपस्थिती हाेती. जन्म, मृत्यू नोंदणी बाबत केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकावर चर्चा झाली. या महत्वाच्या कामासाठी व सामान्य नागरिकांपर्यंतही माहिती पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने योग्य पावलं उचलण्याची अपेक्षा जिल्हाधिका-यांनी केली.
या बैठकीत देशात काही ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे बनावट फसवी संकेत स्थळ तयार करून त्यावरून जन्म मृत्यू प्रमाणपत्र संबंधीताना दिली जात आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेचे फसवणूक करणे सुरू आहे, असे दस्तरखुद्द केंद्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. तर अनेक सार्वजनिक माध्यमातून जन्म मृत्यू प्रमाणपत्राचे वाटपाबाबत लोकांमध्ये अफवा पसरवली जात आहे. खाजगी संस्थांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र कामकाजाची इतर संकेतस्थळ तयार केली आहे. सर्व सामान्य जनतेकडून मोबदला किंवा फी वसूल करून सदर प्रमाणपत्र अदा केली जात आहेत.
CRSORGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATHONLINE.COM ह्या संकेतस्थळावरून फसवे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. नागरिकांनी या संकेतस्थळांचा वापर करू नये म्हणून आवाहनाचे सूचना फलक दर्शनी भागात लावण्याबाबत निबंधकांना कळविण्यात आल्याचे या बैठकीत उघड झाले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक यांनी कारागृहात जन्म झालेल्या बालक-बालिका यांचे जन्म नोंदवही मध्ये जन्मस्थान कारागृह अथवा तुरुंग असे नमूद न करता ज्या कारागृह अथवा तुरुंग जन्म झाला आहे त्या शहराचे व गावाचे नाव नमूद करावे आदी विषय यावेळी चचेर्ला घेण्यात आले.