रस्त्यावर बेवारस, भंगार वाहने उभी कराल तर खबरदार, या महानगरपालिकेने घेतला दंडात्मक कारवाई, जप्तीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:53 PM2020-12-15T14:53:50+5:302020-12-15T14:55:23+5:30
Mira Bhayander News : रस्त्यावर वापरात नसलेली अथवा बेवारस ,भंगार वाहने उगाचच उभी करून नागरिक व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर महापालिका आयुक्तांनी दंड व वाहन जप्ती करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
वसई - वसई विरार महापालिका हद्दीतील सर्वच रस्त्यावर वापरात नसलेली अथवा बेवारस ,भंगार वाहने उगाचच उभी करून नागरिक व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर महापालिका आयुक्तांनी दंड व वाहन जप्ती करण्यासाठी पाऊल उचललि असून तसा आदेश ही निर्गमित केल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.
या आदेशात वसई विरार महापालिका प्रशासनाकडून संबंधितास 200 रु दंड व प्रसंगी वाहन जप्ती करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. जनसंपर्क अधिकारी यांनी माहिती दिल्यानुसार,वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या कडेला वापरात नसलेली, भंगार, बेवारस आणि अपघातग्रस्त वाहने उभी असल्यामुळे व इतर सामान, भंगार पडलेले असल्यामुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे व नागरिकांना येण्या जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे.
तसेच यामुळे शहरातील दैनंदिन स्वच्छतेलाही अडचण निर्माण होत असल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान अशा वापरात नसलेल्या, भंगार, बेवारस आणि अपघातग्रस्त वाहने व सामान जप्त करण्याची प्रक्रिया महानगरपालीकेमार्फत करण्यात येणार आहे. एकूणच सदरील कारवाई करतेवेळी महानगरपालिकेकडून सदर वाहनांवर अथवा सामानावर 24 तासात वाहन किंवा सामान हटविणे बाबतची नोटीस चिटकविण्यात येणार असून 24 तासानंतर महानगरपालिकेमार्फत सदरची वाहने व सामान जप्त करण्यात येईल.
तर जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर व सामानावर जप्तीची कारवाई केल्यापासून प्रतिदिन रुपये 200/- इतका दंड व हटविण्याबाबत झालेल्या खर्चाची रक्कम भरणा करूनच संबंधितांना वाहन अथवा सामान परत घेता येईल. त्यामुळे शहरांतील सर्व नागरिकांनी येत्या दोन दिवसांत रस्त्यांच्या कडेला असलेली आपल्या मालकीची वापरात नसलेली, अपघातग्रस्त वाहने अथवा भंगार, सामान स्वत:हून हटवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे ही आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.