इंटरनेट सेवा पुरविणाऱ्यांनो सावधान; बोगस इंटरनेट पुरविणाऱ्या कंपनीवर पोलिसांचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 08:40 PM2018-07-02T20:40:41+5:302018-07-02T20:41:19+5:30
'स्टार नेट इंटर नेट ब्रॉड बँड' असे या बोगस कंपनीचे नाव
मुंबई - मीरा रोड आणि भाईंदर परिसरात विनापरवाना ग्राहकांना इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या 'स्टार नेट इंटर नेट ब्रॉड बँड' या कंपनीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. नवी दिल्लीतील सेक्रेटरी ऑफ टेलिकॉमचे महासंचालक सुनील कुमार आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार नवघर पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
भाईंदर येथील शिवनिकेतन सोसायटीत असलेल्या 'स्टार नेट इंटर नेट ब्रॉड बँड' या कंपनीवर नवघर पोलिसांनी २५ जून रोजी सायंकाळी ६. १५ वाजता छापा टाकला. या छाप्यात इंटरसेवा पुरविणाऱ्या या बोगस कंपनीच्या नोंदवह्या, बिल बुकं पावती, डेटा आदी साहित्य जप्त करण्यात आले असून कंपनीची रूप सील करण्यात आली आहे. 'स्टार नेट इंटर नेट ब्रॉड बँड'चे मालक भाऊसाहेब कारभारी उगले आणि वोरटेक्स नेट सॉल प्रा. लि. कंपनीचे मालक यांनी संगनमत करून गैरपणे इंडियन टेलिग्राफ ऍक्ट १८८५, कलम ४ चे उल्लंघन करून त्यांनी ग्राहकांना अधिकृत इंटरनेट सेवा पुरविणारी कंपनी असल्याचे भासवून सेवा विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली. नवघर परिसरात ज्याप्रमाणे छापा टाकण्यात आला त्याप्रमाणे नयानगर आणि काशिमीरा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील छापे टाकण्यात आले आहेत.