मुंबईत कोरोना वाढू लागल्याने ठाण्यात सतर्कता बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:59+5:302021-09-19T04:40:59+5:30
ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच ठाणे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा. एवढेच नव्हेतर, जिल्ह्याच्या लगत ...
ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच ठाणे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा. एवढेच नव्हेतर, जिल्ह्याच्या लगत मुंबई शहरात रुग्णसंख्या काहीशी वाढत असून, त्या दृष्टीनेही ठाणे जिल्ह्याने अधिक सतर्कता बाळगावी, असे मार्गदर्शन राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी केले.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत असल्याचा काळ सुरू आहे. त्याकडे लक्ष केंद्रित करून मुख्य सचिवांनी ठाण्यासह अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांचा शुक्रवारी आढावा घेतला. त्यात ठाण्याकडे लक्ष केंद्रित करून मार्गदर्शक आदेशही त्यांनी ऑनलाइन जारी केले आहेत.
ऑनलाइन घेतलेल्या या कोरोना आढावा बैठकीला येथील जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांच्यासह महापालिका आयुक्त आणि अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आदी या वेळी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांहून कमी आहे. मात्र, या जिल्ह्याच्या लगत असलेल्या मुंबईत रुग्णसंख्या काहीशी वाढत आहे. त्यादृष्टीने ठाणे जिल्ह्याने अधिक सतर्कता बाळगावी. चाचण्यांचे प्रमाण वाढवितानाच जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी महापालिका क्षेत्रातदेखील रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी या वेळी दिले.
डास निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवा
कोरोनासोबत जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर दिला पाहिजे. डास निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबविली पाहिजे, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या वेळी सांगितले.
----------