भाजपा इच्छुकाकडून आचारसंहितेचा भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:46 AM2017-07-29T01:46:54+5:302017-07-29T01:46:56+5:30
प्रभाग ९ मधील भाजपाचे दावेदार डॉ. सुरेश येवले यांनी आपल्या प्रचारार्थ नागरिकांना स्वत:चे छायाचित्र असलेल्या वह्यांचे वाटप केले.
भाईंदर : प्रभाग ९ मधील भाजपाचे दावेदार डॉ. सुरेश येवले यांनी आपल्या प्रचारार्थ नागरिकांना स्वत:चे छायाचित्र असलेल्या वह्यांचे वाटप केले. हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी नगरसेवक व उपजिल्हाध्यक्ष फरीद कुरेशी यांनी थेट राज्य निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे तक्रार केली आहे.
२०१२ मधील पालिका निवडणुकीत कुरेशी यांनी डॉ. येवले यांचा पराभव केला होता. त्यावेळी डॉ. येवले यांनी पराभवाचा वचपा काढण्यासाठी फरीद यांनी दर्शवलेल्या जातीवरच टाच आणली. त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कुरेशी यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतानाही त्यांनी पालिका निवडणूक लढवल्याचा मुद्दा डॉ. येवले यांनी उपस्थित केला. अपत्यांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
डॉ. येवले यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी प्रभाग ९ मधून भाजपाचे दावेदार आहेत. त्यांनी २६ व २७ जुलै दरम्यान ऐन आचारसंहितेच्या काळात प्रभागातील नागरिकांना स्वत:चे तसेच पक्षाच्या पदाधिकाºयांचे छायाचित्र असलेल्या वह्यांचे मोफत वाटप केले. याची माहिती कुरेशी यांना मिळताच त्यांनी सुरूवातीला निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे लेखी तक्रार केली. तसेच वाटप केलेल्या वह्या भरारी पथकाच्या ताब्यात दिल्या. यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने कुरेशी यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून पुरावे तपासले जात आहेत. त्यामुळे त्यावर सध्या बोलणे योग्य ठरणार नाही. -जगदीश भोपतराव,
भरारी पथकाचे प्रमुख.
डॉ. येवले यांनी निवडणुकीच्या काळात वह्यांचे वाटप करुन आचारसंहितेचा भंग केल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात चित्रीत झाले आहे. त्याचे फुटेज आपल्याकडे असून ते निवडणूक प्रशासनाला सादर केले जाणार आहे. त्यावर ठोस कार्यवाही न झाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल.
- फरीद कुरेशी, माजी नगरसेवक.
वह्यांचे वाटप आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केले आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग ठरू शकत
नाही. यात आपल्याला नाहक बदनाम करण्याचा डाव आहे.
- डॉ. सुरेश येवले, भाजपा इच्छुक