कलानीना शह देण्यासाठी भगवान भालेराव यांची शरद पवार भेट, उलटसुलट चर्चेला उधाण
By सदानंद नाईक | Published: September 24, 2024 05:51 PM2024-09-24T17:51:28+5:302024-09-24T17:52:45+5:30
शरद पवार कुणाला तिकीट देणार याबाबत सर्वत्र चर्चा
सदानंद नाईक, उल्हासनगर: कलानी कुटुंबानंतर आता रिपाइं आठवले गटातून हकालपट्टी झालेल्या भगवान भालेराव यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभेसाठी भालेराव इच्छुक असून कट्टर समर्थक कलानी यांच्या व्यतिरिक्त इतरांना शरद पवार विधानसभेचे तिकीट देणार का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.
उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. यापूर्वीही त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान पप्पू कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्यावर, ओमी कलानी यांनी तुतारीवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून पप्पु कलानी यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक भगवान टावरे यांच्या समवेत भगवान भालेराव यांनी मंगळवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीने कलानी यांना शह देण्याचा प्रयत्न भालेराव यांनी केला. तसेच तुतारीवर निवडणूक लढविणार असल्याचे भालेराव यांनी जाहीर केल्यावर, कलानी की भालेराव या उलटसुलट चर्चेलाही शहरात सुरवात झाली.
उल्हासनगर मतदारसंघात सिंधी समाज बहुसंख्य असला तरी, अमराठी टक्का ६० टक्क्यांवर गेला आहे. तसेच सिंधी समाज मतदान करण्यास घराबाहेर पडत नसल्याची टीका नेहमी होते. कलानी-आयलानी ऐवजी मराठी चेहऱ्याच्या उमेदवार हवा, या मागणीने जोर पकडल्याचे शहरात बोलले जाते. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कलानी कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवितात की, भालेराव यांच्याकडे वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलानी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघात अटीतटीची लढत होणार असल्याचेही चर्चा आहे.