तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:30 AM2018-02-13T03:30:29+5:302018-02-13T11:04:12+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर काहूर माजले असताना ठाणे, डोंबिवली परिसरांतील काही तरुण संघ स्वयंसेवक सीमेवर जाऊन लढण्यास उत्सुक आहेत, तर काहींनी भाजपाचे बहुमताचे सरकार सत्तेत असताना लष्कराबद्दल अविश्वास दाखवणे अयोग्य असल्याचा सूर लावला.

 Bhagwat split up on volunteers; Seasonal training is being given to the cultural organization | तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट

तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट

Next

डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर काहूर माजले असताना ठाणे, डोंबिवली परिसरांतील काही तरुण संघ स्वयंसेवक सीमेवर जाऊन लढण्यास उत्सुक आहेत, तर काहींनी भाजपाचे बहुमताचे सरकार सत्तेत असताना लष्कराबद्दल अविश्वास दाखवणे अयोग्य असल्याचा सूर लावला.
गांधी हत्येनंतर आलेली बंदी उठावी, याकरिता संघाने आपण सांस्कृतिक संघटना असल्याचे शपथपत्र दिले आहे. मात्र, तरीही संघाच्या शाखेत लाठ्याकाठ्या चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बजरंग दल व तत्सम जहाल हिंदुत्ववादी संघटनांमध्ये स्वयंसेवकांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, अशी कुजबुज वर्षानुवर्षे सुरू आहे. भागवत यांनी केलेल्या विधानामुळे संघ ही केवळ सांस्कृतिक संघटना नाही, ही बाब स्पष्ट झाली तसेच स्वयंसेवकांना सीमेवर जाऊन लढण्याकरिता शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते, अशी कबुलीच भागवतांच्या विधानातून दिली आहे.
संघाच्या शाखांमध्ये, प्रशिक्षण वर्गांमध्ये मातृभूमी, राष्ट्रप्रेमाचे बाळकडू पाजले जाते. संघात होणारे मैदानी खेळ, सांघिक पद्य, वैयक्तिक पद्य, बौद्धिक यासह प्रशिक्षणातील दंडयुद्ध, नि:युद्ध, सूर्यनमस्कार, कवायत यामधून स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. संघाच्या प्रशिक्षणवर्गांतील कवायत भारतीय सैन्याच्या परेडची आठवण करून देणारी असते. सातत्याने या उपक्रमांमुळे संघ स्वयंसेवक स्वसंरक्षण करू शकतो, तसेच बौद्धिकांमधून पद्यांमधून त्यांच्यावर चिंतन-मनन करण्याचे धडे आपोआप गिरवले जातात. त्यामुळे आपोआपच स्वयंसेवक राष्ट्रहिताचा विचार करण्यासाठी व वेळप्रसंगी राष्ट्ररक्षणाकरिता सज्ज होतो, असे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ संघ स्वयंसेवकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
१५ आॅगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी काश्मीर वाचवण्यासाठी संघ स्वयंसेवकांना रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भागवत यांचे आवाहन त्याच पठडीतील असल्याचे स्वयंसेवकांचे म्हणणे आहे. आपत्कालीन परिस्थितीत संघाचे स्वयंसेवक साहाय्यासाठी सरसावले आहेत. संघाच्या शिबिरांमध्येही अनेकदा आपत्कालीन परिस्थितीचे धडे देण्यासाठी ‘डेंजर कॉल’ दिला जातो. अचानक शिट्या वाजवल्या जातात. राहुटीमधले स्वयंसेवक धावाधाव करतात. मैदानात एकत्र येतात. आपत्कालीन स्थितीत काय पवित्रा घ्यावा, याचे प्रशिक्षण दिले जाते.
खडबडीत जमिनीवरच झोपणे, जेवायला बसणे, स्वत:चे पांघरूण आवरणे, जेवणाचे ताट स्वत: धुणे, अंघोळीची सोय असल्यास कपडे धुणे, स्वत:चे सामान स्वत: सांभाळणे, तंबूतील सहकाºयांची काळजी घेणे, हे संस्कार देतात. रात्री व दिवसभराच्या पहाºयासाठी स्वयंसेवकांनाच तयार केले जाते. दोनदोन तासांकरिता चमूने हद्दीचे संरक्षण करायचे, असे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, संघ स्वयंसेवकांना कोणकोणती शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यामध्ये रिव्हॉल्व्हर, रायफल अशा लष्कर किंवा पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांचा समावेश असतो का, याबाबत स्वयंसेवकांनी चुप्पी साधली.

सोशल मीडियावर मात्र दोन गट
रा.स्व. संघाच्या ब्राह्मण समूहाचा समावेश असलेल्या एकदोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर भागवतांच्या विधानाबद्दल परस्परविरोधी मते व्यक्त झाली. ग्रुप सदस्यांमध्ये दिवसभर घमासान चर्चा झाली. काहींनी भागवतांची बाजू उचलून धरली, तर काहींनी आपले (भाजपाचे) बहुमताचे सरकार सत्तेवर असताना लष्करावर अविश्वास दाखवणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.

केवळ सीमेवर जाऊन रक्षा करणे म्हणजे राष्ट्रीयत्व नसते. ते जळीस्थळी जपावे लागते. संघाने नेहमीच तशी शिकवण दिलेली असते. त्यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नसते.
- प्रमोद बापट, प्रचार प्रसिद्धिप्रमुख, कोकणप्रांत, रा. स्व.संघ

राष्ट्रोत्थान या पुस्तिकेत सरसंघचालकांच्या मुलाखतीत एका सैन्याच्या अधिकाºयानेच दिलेल्या माहितीनुसार संघाच्या तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकास सैन्याचे प्रशिक्षण देणे सोपे जाऊ शकते. कारण, वर्षानुवर्षे सततच्या संस्कारांमुळे सैन्य दलात जसे रफटफ काम असते, त्याची सवय स्वयंसेवकांना झालेली असते. त्यामुळे सहनशक्ती, कठोर अनुशासन हे सगळे स्वयंसेवकांमध्ये सहज दिसून येते. - कुणाल मानकामे, महाविद्यालयीन विद्यार्थी, पनवेल

खरेतर, अशी वेळ येऊ नये. पण, जर राष्ट्र संकटात असेल, तर मात्र आम्ही नक्कीच मातृभूमीसाठी सज्ज होऊ.
- गौरव पवार, सॉफ्टवेअर अभियंता, पनवेल

सरसंघचालक भागवतांनी जे व्यक्तव्य केले आहे, ते पूर्ण ऐकणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, संघामध्ये सैन्यासारखी शिस्त, अनुशासन असते. ते खरेच आहे. संघाच्या पद्यासह बौद्धिकांमध्ये राष्ट्रप्रेम, मातृभूमीलाच प्राधान्य देण्यात आले आहे. ‘हम करे राष्ट्र आराधन’ असो की, संघाची ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही प्रार्थना असो, त्याचा अभ्यास केल्यास भारतमातेला परमवैभव प्राप्त व्हावे, हीच मागणी केली आहे.
- अर्जुन भाबड, कल्याण जिल्हा संयोजक, बजरंग दल

संघामध्ये शिस्तीला प्राधान्य दिले जाते. ती खूप महत्त्वाची असते. सैन्यामध्येही तेच आवश्यक असते. स्वयंअनुशासनाने बराच फरक पडतो. ते संघाच्या प्रत्येक संस्कारांतून आपोआप मिळते. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नसते. त्यामुळे सैन्यामध्ये संघ स्वयंसेवक अल्पावधीतच रुळू शकतो. राष्ट्रप्रेमाखातर अडीअडचणींची त्याला सवय असते. - रोहन शिंदे,
मेकॅनिकल अभियंता, ठाणे

मला सैन्यातच जायचे होते, पण ते शक्य झाले नाही. संघामध्ये स्वयंसेवकांची मानसिकता राष्ट्रभक्तीसाठी तयार झालेली असते. त्यामुळे जर तशी स्थिती आली, तर आम्ही निश्चितच तयार आहोत.
- चंद्रकांत मोरे, सॉफ्टवेअर अभियंता, ठाणे

संघाने नेहमीच भारताला सहकार्य केले आहे. देशातील आतंकवादाला थोपवण्यासाठी संघ स्वत:च्या जोरावर विशेष प्रयत्न करणार असेल, तर ते सैन्याला पूरकच आहे. जर संघाने हाक दिली, तर आम्ही राष्ट्रासाठी नक्कीच पुढे येऊ.
- कौस्तुभ पालये, कला शाखेचा विद्यार्थी, खोपट-ठाणे

राष्ट्रभक्तीला संघाने नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जर देशाला गरज पडली, तर आम्ही सैन्याला साहाय्य करणार. प्रत्यक्ष सैन्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी काहीसा अवधी जाईल. पण, सरसंघचालकांनी आवाहन केल्यास तीन दिवसांत नक्कीच मानसिकता तयार होऊ शकते.
-अथर्व थत्ते,
टेकडीबंगला, ठाणे

Web Title:  Bhagwat split up on volunteers; Seasonal training is being given to the cultural organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.