भाग्यलक्ष्मीचे ११ मच्छीमार सुखरूप; दुर्घटनेनंतर ४३ तासांनी गाठला किनारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:05 AM2018-08-22T00:05:57+5:302018-08-22T00:06:23+5:30
डहाणूच्या किनाऱ्यापासून ३० नॉटिकल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या भाग्यलक्ष्मी बोटीतील ११ मच्छीमार सुमारे त्रेचाळीस तासांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास किनाऱ्यावर सुखरुप परतले.
- अनिरुध्द पाटील
बोर्डी : डहाणूच्या किनाऱ्यापासून ३० नॉटिकल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या भाग्यलक्ष्मी बोटीतील ११ मच्छीमार सुमारे त्रेचाळीस तासांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास किनाºयावर सुखरुप परतले. त्यांना भेटण्यासाठी कुटुंबीय, मच्छीमार, स्थानिक नागरिक तसेच मत्स्य विभाग व तटरक्षक दलाचे अधिकारी आदींनी गर्दी केली होती.
भानुदास गजानन तांडेल यांची ही मासेमारी बोट रविवारी १९ आॅगस्टच्या रात्री आठच्या सुमारास बुडाली. तसा वायरलेसद्वारे पहिला संदेश गुंगवाडा मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन अशोक अंभीरे यांना मिळाल्यावर त्यांची पवनसाई बोट, भूपेश मर्दे यांची तुळजाभवानी, गणेश तांडेल यांची गौरी तसेच जागृती, जमनाप्रसाद, प्रियदर्शनी या बोटी मदतीकरिता धावून गेल्या. तर दाजी तांडेल यांनी बंदरातून डिझेल आणि अन्य सामुग्री सोबत घेऊन महालक्ष्मी बोटीतून खोल समुद्रात कूच केली. तेथे पोहोचल्यावर या बोटींनी ११ खलाशांना आपापल्या बोटीवर सुखरूप घेतले. त्यानंतर फायबर कोटींगच्या दुर्घटनाग्रस्त बोटीला दोरखंडांनी त्यांच्या बोटींना बांधून किनाºयाकडे वाटचाल केली. ते सोमवारी सकाळपर्यंत किनारा गाठतील असा संदेश आणि खोल समुद्रातून येतानाचे फोटो व व्हीडिओ त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अन्य मच्छिमारांना पाठवले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयासह संपूर्ण कोळीवाडा तसेच स्थानिक किनाºयावर आतुरतेने वाट पाहत होते. मात्र वारा आणि लाटांमुळे अपघातग्रस्त बोटीसह किनारा गाठतांना, त्यांना मंगळवारचे दुपारचे तीन वाजले. उपस्थितांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
मत्स्य विभाग व तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारीही या वेळी हजर होते. बोटीच्या केबिनचे नुकसान झाले असून जाळी वाहून गेली आहेत. हे खलाशी शारीरिक व मानिसक दृष्ट्या थकल्याने, बुधवारी जबाब व पंचनाम्याची प्रक्रि या पूर्ण होईल.
हे बचावले सुखरुप
बोटीचे मालक भानुदास तांडेलसह, जयवंत तांडेल, तुळशीदास तांडेल, नरेश दवणे, संजय काटेला, राहुल ठाकरे, निलेश वळवी, अजय वरळ, महेश मानकर, गणपत हाडळ, राध्या वळवी आदींचा सुखरूप पोहोचलेल्यात समावेश होता.