हरियानातील ‘दंगली’साठी कल्याणची भाग्यश्री सज्ज
By admin | Published: January 12, 2017 06:59 AM2017-01-12T06:59:09+5:302017-01-12T06:59:09+5:30
दंगल चित्रपटामुळे ज्या हरियानाचे नाव कुस्तीतील मुलींच्या लढतीसाठी गाजते आहे,
मुरलीधर भवार / कल्याण
दंगल चित्रपटामुळे ज्या हरियानाचे नाव कुस्तीतील मुलींच्या लढतीसाठी गाजते आहे, त्याच हरियानातील कुस्ती स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे कल्याणची भाग्यश्री भोईर. खेळाची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या कुटुंबाने यानिमित्ताने साऱ्या परिसरासमोर आदर्श ठेवला आहे.
बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भाग्यश्रीने मुंबई विद्यापीठ पातळीवर घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. हरियानात १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत ती लढत देण्यास सज्ज आहे. त्यासाठी तिने जोरदार सराव केला आहे. तेथेही सुवर्ण कामगिरीचे वेध तिला लागले आहेत.
३ जानेवारीला बीपी डीएड वडाळा कॉलेजमध्ये मुंबई विद्यापीठाच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भाग्यश्रीला सुवर्णपदक मिळाले. त्या स्पर्धेत पहिल्या फेरीत ती चित झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत तिने प्रतिस्पर्धी मुलीला एकही पॉईंट मिळू दिला नाही. त्यात तिला सलग आठ-आठ गुण मिळाले.
भाग्यश्रीचे शालेय शिक्षण कल्याणच्या ओक हायस्कूलमध्ये झाले. सध्या ती बिर्ला कॉलेजमध्ये शिकते. मागच्या वर्षीपासूनच तिला कुस्तीत रस निर्माण झाला असून वर्षभरात तिची ही उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद आहे. भाग्यश्रीला गतवर्षी किसन भोईर हे कुस्तीचे डावपेच शिकवित होते. विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी सुरेश काकडे यांनी तिला प्रशिक्षण दिले. हरियानाच्या स्पर्धेसाठी ती नांदिवली येथील सुभाष ढोणे यांच्या कुस्तीच्या तालमीत सराव करीत असून तिला सुरेश काकडे व मदन साळुंके प्रशिक्षण देत आहेत.
‘दंगल’ तिलाही भावली
कुस्ती स्पर्धेत सुवर्णकन्या ठरलेल्या भाग्यश्रीने घरांच्यासोबत आमीर खानचा दंगल सिनेमा पाहिला आहे. तिला तिचे वडील फोगाट यांच्या जागी दिसतात. भाग्यश्रीला एक बहिण व एक भाऊ आहे. ‘दंगल’मध्ये सराव भरपूर आहे. भाग्यश्रीचा सराव त्या तुलनेत कमी आहे, हे तिनेच नमूद केले.
कुटुंब रंगलंय खेळात
भाग्यश्रीचे वडील काथोड भोईर हे ठाण्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीला आहेत. ते वेटलिफ्टर आहेत. त्यांनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. त्यांचे घर पदक व मानचिन्हांनी भरले आहे. भाग्यश्रीची आई उंबर्डे गावातील माध्यमिक शाळेत क्रीडाशिक्षिका आहे. भाग्यश्रीची बहिण आशिका वेटलिफ्ंिटगच्या खेळात प्राविण्य मिळवित आहे. तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली आहे. सध्या ती देखील बिला कॉलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्षाला आहे. भाग्यश्रीचा लहान भाऊ ओंकार नववीत शिकतो आहे. त्यालाही कुस्तीत रस आहे. तोदेखील राज्य पातळीवर कुस्ती खेळला आहे.