भाईं वैद्य यांनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य पुढे नेतील. - प्रकाश कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 05:09 PM2018-04-08T17:09:23+5:302018-04-08T17:09:23+5:30
ठाणे : कोणतेही काम ,सामाजिक चळवळ, प्रामाणिकपणे केली तर हमखास यश येतेच पण त्याला लागणारा पैसाही कमी पडत नाही. हे ज्येष्ठ समाजवादी नेते ,राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैद्य यांच्या कामातून दिसून येते, भाईंनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य पुढे नेतील, असा विश्वास राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्र सेवा दल-ठाणे जिल्हा आणि समाजवादी ,समविचारी संस्था संघटना यांच्या वतीने ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाई वैद्य यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून भाईंच्या सहवासातील पत्रकार विनायक उर्फ अण्णा बेटावदकर, नगरसेवक दशरथ पाटील, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील उपस्थित होते, सेवा दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ते सुहास कोते यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. एकलव्य प्रतिष्ठानचे मोहन सकपाळ, लोकजागर, अनुबंधच्या मीनल सोहोनी, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरासिया , ठाणे मतदाता जनजागरण संस्थेचे उन्मेष बागवे, साम्यकुल, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे जीवराज सावंत, राष्ट्र सेवा दल कलापथकाचे प्रमुख सदानंद राणे, पंचायत भारतीचे सतिश वैवुडे, तसेच स्वराज अभियानचे संजीव साने यांनी भाई वैद्य यांच्यावर लिहीलेला लेख वाचून दाखवण्यात आला. अनेकांनी भाईंच्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती दिली.. भाई सामाजिक संस्था-संघटनांचे नुसते मार्गदर्शकच नव्हते तर, खऱ्या अर्थाने ते आधार स्तंभही होते. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष असताना एनराँनचा सत्याग्रह तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा महत्वाचा सहभाग, भारत यात्रेतील चार हजार कि.मि.ची पदयात्रा. बँ. ए.आर,अंतुले सरकार विरोधातील मोर्चा. या बरोबरच मंत्री असताना निवृत्त झालेल्या कर्मचार्यांचे निवृत्तीवेतन महागाई भत्ताशी जोडण्याचा निर्णय तसेच पोलिस कर्मचार्यांचे हाफ पँट ऐवजी फुल पँट करण्याचा निर्णय घेतला, अटकेत असलेल्या स्मगलरच्या सुटकेसाठी लाच घेवून आलेल्यांना रंगेहात पकडून दिले. पुणे महापालिकेच्या महापौर पदाच्या वेळची त्यांची कामे. श्रमिकांच्या वस्त्यातील सुविधांसाठी केलेले प्रयत्न, अशा अनेक विषयांवर वक्त्यांनी आपले अनुभव सांगून ,उत्तम वक्ता, साक्षेपी व्यासंगी अभ्यासक, उत्तम संघटक म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर होता. भाई गृहराज्यमंत्री असताना लेखनात कसे मार्गदर्शन मिळाले हे अनेक उदाहरणे देऊन जेष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांनी सांगितले. ठाण्याचे पहिले पोलीस आयुक्त रिबेरो, तसेच सतीश सहानी,अशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून अधिकारापेक्षा स्नेहाचे संबध ठेऊन अनेक कठीण प्रसंगात बातम्या कशा मिळवता येतात. चुकीच्या माहितीच्या आधारे दिलेल्या बातमीचा समाजावर कसे परिणाम होतात अशी अनेक उदाहरणे ते सागत. १९६० साली पुणे येथे मॉडर्न हायस्कूल (जंगली महाराज रोड) येथे झालेल्या शिबिरात भाईनी तत्कालीन राजकीय पक्ष,व सार्वत्रिक निवडणुकांतील प्रचाराचा मतदारावर कसा परिणाम होतो, ही त्यांची त्यावेळची शिबिरातील बौद्धिके लेखन करताना आपल्याला कशी मार्गदर्शक ठरली ते पत्रकार अण्णा बेटावदकर यांनी सांगितले. ही आदरांजली सभा मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे झाली. सभेला ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, मुंबई भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.