भाईंदर भाजपात बंडाचा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:54 AM2017-08-02T01:54:08+5:302017-08-02T01:54:08+5:30

मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असे भाजपाने जाहीर केले खरे, पण पक्षातील बंडखोरी उफाळून आल्याने

Bhaindar BJP announces rebellion | भाईंदर भाजपात बंडाचा वणवा

भाईंदर भाजपात बंडाचा वणवा

Next

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असे भाजपाने जाहीर केले खरे, पण पक्षातील बंडखोरी उफाळून आल्याने आणि नाराजांनी समर्थकांसह निदर्शने सुरू केल्याने अखेर रात्री उशिरापर्यंत यादी प्रसिद्ध झाली नाही. ज्यांना गुपचूप आॅनलाइन भरण्याची सूचना दिली होती, त्यांनाही नंतर अडवण्यात आले. पक्षातील अस्वस्थता पराकोटीची असल्याने भाजपा नेतृत्वाचे धाबे दणाणले आहे.
अर्ज बुधवारी दुपारपर्यंत भरायचे आहेत. त्यामुळे मंगळवारची रात्र उमेदवारांच्या निर्णयासाठी, अर्ज भरण्यासाठी मोलाची ठरणार आहे.
पक्षाने केलेले सर्वेक्षण, आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेली शिफारस या आधारे ६८ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती. तिला ते हिरवा कंदिल देतील अशी अपेक्षा होती. थेट उमेदवार निवडीपासून मेहता दूर असले तरी यादीवर त्यांचीच छाप आहे. त्यामुळे मेहता समर्थकांपैकी काहींनी आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरूवातही केली. उमेदवारांची रितसर यादी जाहीर होण्यापूर्वी त्यांना तशी सूचना देण्यात आली होती. याची कुणकुण लागताच त्या मतदारसंघातील बंडखोर संतापले आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. निदर्शने केली. हे बंडाचे लोण शहरभर पसरत जाईल, धास्तीपोटी लगोलग नवे निरोप देत काहींचे अर्ज भरणे थांबवण्यात आले.
शिवसेनेतून भाजपात आलेले नगरसेवक प्रशांत दळवी यांना प्रभाग २० मधून रविवारी अर्ज भरण्यास सांगितल्याने त्यांनी अर्ज भरला. पण स्थानिक भाजपा नगरसेवक दिनेश जैन व त्यांचे कार्यकर्ते बंडाचा पवित्रा घेत आक्र मक झाले. त्यांना जैन समाजातील व्यक्तींनी पाठिंबा दिला. त्याचवेळी दिनेश जैन यांनी शिवसेनेत जाण्याच्या हालचाली सुरु केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. आधीच भाजपाच्या नगरसेविका दीप्ती भट शिवसेनेत गेल्या असताना जैनही गेल्यास प्रभाग २० चे पॅनल धोक्यात येण्याची शक्यता आहे. अखेर दिनेश यांना उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आणि प्रशांत दळवी यांना प्रभाग १८ देण्यात आल्याने ते नाराज झाले. उमेदवारी मिळूनही त्यांची कोडी झाली.
भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग २ मधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात न आल्याने ते आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. भाजपाच्या नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनाही अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. परंतु त्यांचे वडील तथा ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना हिरवा कंदील दाखवल्याने त्यांनी अर्ज भरला. महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असून म्हात्रे या प्रमुख दावेदार मानल्या जातात. पण भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल मेहता यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत पुढे असल्याने म्हात्रे यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे . भाजपाचे पाच वेळा नगरसेवक असलेले शरद पाटील यांनाही प्रभाग पाचमधून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. प्रभाग १४ मधून भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांना पण अर्ज भरण्यास सांगण्यात आले नसल्याने ते अस्वस्थ आहेत. या याशिवाय अनेक प्रभागातून विद्यमान नगरसेवकांना किंवा पक्षाने आधी ज्यांना आश्वासन दिले होते त्यांना काहीही न सांगितल्याने ते बंडाच्या पवित्र्यात आहेत.

Web Title: Bhaindar BJP announces rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.