भाईंदरचे मासळी मार्केट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:30 AM2019-06-15T00:30:28+5:302019-06-15T00:30:47+5:30
अडीच महिन्यापूर्वी बांधली इमारत : भरपावसात विक्रेते रस्त्यावर बसणार, वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त
भार्इंदर : भार्इंदर पूर्वेच्या खारीगाव मासळी मार्केटची तळमजली इमारत बांधून अडीच महिने झाले तरी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळा सुरू झाला तरी उद्घाटन न झाल्याने विक्रेत्यांना भर पावसात रस्त्यावर मासळी विकण्याची वेळ आली आहे. तर मासळी मार्केट सुरू करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक कुसुम गुप्ता व धनेश पाटील यांनी केली आहे.
खारीगावातील बाजार व औद्योगिक वसाहतीत असलेले खारीगाव मासळी मार्केट हे ग्रामपंचायतीच्या काळापासूनचे आहे. या मार्केटच्या नूतनीकरणासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पालिका कर वसुली करायची तर ग्रामस्थां कडून ही जागा गावकीची असल्याचा दावा केला होता. मात्र ही जागा स्थानिकांच्या मालकीची निघाल्याने अखेर पालिकेने त्याला जागेचा पैशांच्या स्वरूपात सुमारे २५ लाखांचा मोबदला देत जागा खरेदी केली. जागेच्या मालकीचा वाद मिटल्याने अनेक वर्ष पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मासळी मार्केटच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. २०१७ मध्ये मार्केट बांधण्यासाठी महासभेने ६४ लाख ३९ हजाराच्या खर्चास मंजुरी दिली. पालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने मार्केटचे बांधकाम पूर्ण करून सुमारे अडीच महिने झाले. परंतु हे काम सुरू झाल्यापासून मासळी विकणाऱ्या महिला या रस्त्यावरच बसून मासळी विकतात.
कडक उन्हाळा या विक्रेत्यांनी रस्त्यावरच काढला. आता पावसाळा सुरू झाला तरी मार्केट सुरु करण्याचे पालिका नाव काढत नसल्यान ेविक्रेत्या संतापल्या आहेत. मार्केट तयार झाले असताना आता पावसाळाही रस्त्यावरच भिजत काढायचे का ? असा सवाल त्या करत आहेत. त्यातच रस्त्यावर मासळी बाजार भरत असल्याने आधीच अरूंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांना चालणे जिकरीचे झाले आहे. शिवसेना नगरसेविका कुसुम गुप्ता व धनेश पाटील यांनी मासळी मार्केट त्वरित खुले करण्याची मागणी केली आहे. कुसुम यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. उद्धाटनाची वाट न पाहता मार्केट सुरू करण्याचा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे.