भार्इंदरपाडा मैदानाचा प्रस्ताव रद्द होणार
By admin | Published: June 27, 2017 03:17 AM2017-06-27T03:17:02+5:302017-06-27T03:17:02+5:30
भार्इंदरपाडा येथील खेळाचे मैदान शिवसेनेच्या एका नेत्याला देण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भार्इंदरपाडा येथील खेळाचे मैदान शिवसेनेच्या एका नेत्याला देण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी रेटून मंजूर करुन घेतला होता. परंतु, या प्रस्तावाविरोधात प्रशासनावर टीका झाल्यानंतर आणि ‘लोकमत’ने या प्रस्तावाविरोधात आवाज उठविल्यानंतर अखेर हा प्रस्तावच रद्द करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरु केल्या आहेत.
राष्ट्रवादीने या प्रस्तावाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली होती. तसेच, भाजपासह ठाण्यातील क्रीडाप्रेमींनीही पालिकेच्या या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला होता.
भार्इंदरपाडा येथील मैदान शिवसेना नेत्याच्या कंपनीला नाममात्र दरात भाडेतत्वावर देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव पालिका प्रशासनाने मागील महिन्यांतील महासभेत मांडला होता. या प्रस्तावाच्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला होता. तसेच शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीदेखील या विरोधात भूमिका घेतली होती. असे असतांनादेखील यावर चर्चा न करताच हा प्रस्ताव गोंधळात मंजूर केला होता. ३० वर्षांनी भाडेतत्वावर देताना पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया का राबविली नाही, एकाच ठराविक संस्थेला विशिष्ट अटीशर्ती आखून हे मैदान भाड्याने देण्याचा निर्णय सर्वांना समान न्याय या तत्वाला हरताळ फासणारा नाही का, या निर्णयाचा फायदा घेऊन खेळाची अन्य मैदाने बळकावली जातील, असे अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींसह विरोधकांनी केले होते.
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी हा प्रस्ताव रद्द करावा, असे पत्र आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. तर, शिवसेनेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली होती.