भंडार्ली घनकचरा प्रक्रिया प्रकल्प चार महिने लांबणीवर; ठामपा आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 09:54 AM2022-03-26T09:54:18+5:302022-03-26T09:54:50+5:30
ठाणे : भंडार्ली येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प जानेवारी महिन्यात सुरू होणार असल्याचा दावा यापूर्वी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा ...
ठाणे : भंडार्ली येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प जानेवारी महिन्यात सुरू होणार असल्याचा दावा यापूर्वी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केला होता; परंतु आता प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तो येत्या मे महिन्यात सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सहा महिन्यात डायघर प्रकल्प सुरू करण्याची हमीदेखील त्यांनी यापूर्वी दिली होती; परंतु आता त्याचा पहिला टप्पा वर्षाअखेरीस सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांसह या दोन्ही ठिकाणांची पाहणी केली. या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, वाहनांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. जागेच्या सभोवताली कुंपण बांधणे, पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी चर खोदणे, बोअरवेल खोदणे व साइट ऑफिस उभारणे व एमआरएफ मशीन उभारणी करण्याकरिता प्लॅटफॉर्म तयार करणे, कम्पोस्टिंग विंड्रो सरफेस तयार करण्याचे काम सुरू आहे.
या ठिकाणी ३ एमआरएफ मशीन कार्यान्वित राहणार असून, प्रत्येक मशीनची ३५० टन क्षमता आहे. जवळपास १००० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. हा प्रकल्प मे महिन्यात पूर्ण करून प्रथम २ एमआरएफ मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
डायघरला १३ मेगावॉट वीजनिर्मिती
डायघर येथील घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांचीदेखील पाहणी करून आयुक्तांनी आढावा घेतला. येथे बंदिस्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून, दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून निगेटिव्ह प्रेशर यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता, वृक्षलागवड आणि संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पातून १३ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पाचे स्थापत्य काम प्रगतिपथावर असून, या वर्षाअखेर कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील एमआरएफ मशीन परदेशातून येणार असून, याचा कार्यादेश देण्यात आला आहे. मे महिन्यात या मशीन येण्याची शक्यता आहे. ६ विभागात मशीन कार्यान्वित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षाअखेर एमआरएफ सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
डेब्रिज न उचलल्यास ठेकेदारावर कारवाई
बांधकाम आणि तोडफोड साहित्याची पुनर्चक्रिकरण प्रकिया प्रकल्पाचाही आढावा घेतला. शहरातील रस्त्यावरील डेब्रिज तत्काळ उचलून प्रक्रिया ठिकाणी आणावे, ते उचलण्यास विलंब झाल्यास संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.