उल्हासनगरातील खाजगी रुग्णालयावर भरारी पथकाची नजर, ८० टक्के बेड कोरोना रूग्णांना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:17 PM2020-07-10T18:17:12+5:302020-07-10T19:15:25+5:30
उल्हासनगरातील खाजगी रुग्णालय संशयित रुग्णावर उपचार करण्यास नकार देत असल्याने अनेकांचे जीव गेले. अद्यापही हीच परिस्थिती असल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे.
उल्हासनगर : शहरातील खाजगी रुग्णालयात संशयीत रुग्णावर वेळीच उपचार होण्यासाठी व खाजगी रुग्णालयावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेने भरारी पथकाची स्थापना केली. खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले असून उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयावर कारवाईचे संकेत महापौर लीलाबाई अशान यांनी दिले आहे.
उल्हासनगरातील खाजगी रुग्णालय संशयित रुग्णावर उपचार करण्यास नकार देत असल्याने अनेकांचे जीव गेले. अद्यापही हीच परिस्थिती असल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान अशा रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून झाल्यावर, महापौर लीलाबाई अशान यांच्या आदेशानुसार तत्कालीन आयुक्तांनी खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव असल्याचे आदेश काढले. मात्र बहुतांश रुग्णालयाने महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. अखेर महापौर लीलाबाई अशान यांनी शहरातील परिस्थितीची माहिती आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना देऊन, आयुक्तांना भरारी पथक स्थापन करण्याचे सुचविले आहे.
महापालिकेच्या भरारी पथकात महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यास सबंधित प्रभाग समिती कार्यालयातील अधिकारी असणार आहेत. प्रभाग हद्दीतील खाजगी रुग्णालयाची पाहणी भरारी पथकाद्वारे करून एकूण किती बेड आरक्षित ठेवून रुग्णावर उपचार केले जातात. आदींची माहिती पथक घेणार असून संशयित रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयावर गुन्हा दाखल करून सबंधित डॉक्टरची पदवी रद्द का करू नये. याबाबतची शिफारस मेडिकल कौन्सिल कडे करण्यात येणार असल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी पत्रकारांना दिली आहे. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार बिलाच्या नावाखाली रुग्णांना लाखो रुपये उखळले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आल्याची माहितीही महापौरांनी दिली.
तरुणाचा तडफडून मृत्यू
एका कोरोना बाधित तरुणाला मध्यवर्ती रुग्णालयाने पत्र देवून शहर पूर्वेतील महापालिका कोरोना रूग्णालयात पाठविले. मात्र तेथे व्हेंटिलेटर बेड नसल्याचे सांगून इतरत्र जाण्यास सांगण्यात आले.. शहरातील खाजगी रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने, कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केले. मात्र उपचाराच्या नावाखाली भरमसाठ फी घेवूनही रुग्णांचा काही तासातच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबांनी केला. कोरोनाच्या महामारीत डॉक्टरांकडे देवाचे रूप पाहतो. मात्र काही डॉक्टररुपी देव रूग्णांना पैशाची मशीन सापडले. असे पाहत असल्याची खंत कुटुंबाने व्यक्त केली.