उल्हासनगर महापालिका सभागृह नेतेपदी भरत गंगोत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 05:54 PM2020-10-27T17:54:18+5:302020-10-27T17:54:42+5:30
Ulhasnagar Municiple Corporation : उल्हासनगर महापालिका स्थायी व विशेष समिती सभापती पदावरून शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे.
उल्हासनगर : महापालिका सभागृह नेते पदी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांची आजच्या महासभेत पिठासीन अधिकाऱयांनी निवड झाल्याचे घोषित आली. त्यापूर्वी शिवसेनेचे राजेंद्र चौधरी यांनी सभागृह नेते पदाचा राजीनामा दिला असून ओमी टीम समर्थक नगरसेवकही शिवसेनेकडे आल्याचे चित्र शहरात आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी व विशेष समिती सभापती पदावरून शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसेना आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला खुश करण्यासाठी प्रभाग समिती क्र-४ च्या सभापती पदी कॉंग्रेसच्या अंजली साळवे याना शिवसेनेने बिनविरोध निवडून आणले. तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी याना सभागृह नेते पदाचा राजीनामा द्यायला लावून राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांची आजच्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी सभागृह नेते पदी निवड केल्याचे घोषित केले. महापौर पद शिवसेनेकडे तर उपमहापौर पद रिपाइंकडे आहे. प्रभाग समिती क्र-३ च्या सभापती पदी भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक शुभांगी निकम याना बिनविरोध शिवसेनेने निवडून आणले. इतर प्रभाग समिती क्र १ व २ च्या सभापती पदीही शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार असल्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने परंपरागत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला डावलून महापौर पदासाठी स्थानिक ओमी कलानी टीम सोबत महाआघाडी केली. बहुमत साठी स्थानिक साई पक्षाला सोबत घेऊन महापौर पदी मिना आयलानी निवडून आल्या. त्यानंतर महापौर पदावरून भाजप विरुद्ध ओमी कलानी असा वाद उभा राहिला. विधानसभेची उमेदवारी दिली नसल्याच्या निषेधार्थ ओमी कलानी समर्थक नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना मतदान करून महापौर पदी निवडून आणले. तेव्हा पासून भाजपला गळती लागली असून स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणूक दरम्यान शिवसेनेने भाजपात उभी फूट पाडली. महापौर निवडणुकी दरम्यान स्थानिक साई पक्षाचे १० नगरसेवक भाजपात सामिल झाले. त्यापैकी काही नगरसेवक भाजपातून बाहेर पडण्याचा मनस्थितीत असल्याचेही बोलले जात आहे