भार्इंदर, वसई, विरारसाठी पोलीस आयुक्तालय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:57 AM2017-08-04T01:57:48+5:302017-08-04T01:57:48+5:30
मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने तत्वत: मान्य केली आहे.
शशी करपे
वसई : मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने तत्वत: मान्य केली आहे. राज्य सरकारने यात थोडी सुधारणा करून मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापनेस लवकरच मंत्रीमंडळाची मंजूरी लाभेल, अशी माहिती दिली. परिसराची लोकसंख्या ३९ लाख असून ४६ संवेदनशील ठिकाणे आहेत. हे सर्व या पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येतील. वसई आणि विरार येथे दोन उपविभागीय कार्यालये असतील. वसई अंतर्गत सहा पोलीस ठाणी आणि तर विरार अंतर्गत सहा पोलीस ठाणी असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
सरकारने पालघर वगळून मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याच्या निर्णय घेतला आहे. सध्या मीरा भाईंदर परिसरात काशी मीरा, नवघर, कनकिया (मीरा रोड), भाईंदर, उत्तन अशी पोलीस ठाणी असून एक उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. याठिकाणी आणखी दोन पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. तर वसई विरार परिसरात विरार, नालासोपारा, वसई, माणिकपूर, वालीव, अर्नाळा, तुळींज अशी सात पोलीस ठाणी आहेत. तर विरार, नालासोपारा आणि वसई अशी तीन पोलीस उपअधिक्षक कार्यालये आहेत. याठिकाणी आणखी सहा पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात १३ पोलीस ठाणी होतील.