भार्इंदरमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा
By admin | Published: June 20, 2017 06:24 AM2017-06-20T06:24:22+5:302017-06-20T06:24:22+5:30
पालिका निवडणुकीच्या तोंडावर मीरा-भार्इंदर भाजपाच्या नेतृत्वाविरोधात टीकेची झोड उठवत भ्रष्टाचार, लूटमार आणि भयमुक्त शहर करण्याचा, पारदर्शक विकासाचा मुद्दा संघ परिवारातील ज्येष्ठ
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : पालिका निवडणुकीच्या तोंडावर मीरा-भार्इंदर भाजपाच्या नेतृत्वाविरोधात टीकेची झोड उठवत भ्रष्टाचार, लूटमार आणि भयमुक्त शहर करण्याचा, पारदर्शक विकासाचा मुद्दा संघ परिवारातील ज्येष्ठ निष्ठावंतांनी मांडल्याने भाजपाची अडचण झाली झाली आहे. नव्याने भाजपात आलेल्यांसह शहरातील अन्य मंडळींना सोबत घेत या ज्येष्ठांनी भार्इंदर जनसेवा पार्टीची अर्थात ‘भाजपा’ची स्थापना केली आहे.
या नव्या भाजपाच्या झेंड्याखाली मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाच्या नावे पालिकेच्या सर्व जागा लढवण्याचे त्यांनी जाहीर केले. पालिका निवडणुकीपूर्वीच संघ व भाजपाच्या ज्येष्ठांनी स्थानिक नेतृत्वाविरुध्द दंड थोपटल्याने ‘भाजपा विरुध्द भाजपा’ असाही सामना रंगणार आहे.
माजी पालिका आयुक्त आणि भाजपात प्रवेश करुनही गेली पाच वर्षे अडगळीत टाकलेले शिवमूर्ती नाईक, संघाचे स्वयंसेवक तथा ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया, संघ व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. दिलीप पंडित, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व स्टील असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मित्तल, संघ व भाजपाशी जोडलेले भगवान कौशिक आदींनी जनता दल (से.) चे माजी नगरसेवक मीलन म्हात्रेंसोबत मिळून भार्इंदर जनसेवा पार्टीची स्थापना केली आहे.
नाईक हे या पक्षाचे अध्यक्ष, सचिवपदी म्हात्रे, उपाध्यक्षपदी गाडोदिया व कौशिक, खजिनदारपदी पंडित, तर प्रसिध्दीप्रमुख म्हणून विलास भोईर काम पाहणार आहेत.
सर्व नागरिक जरी भाजपाच्या बाजुचे असले, तरी स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या मनमानी व दहशतवादी कारभारामुळे प्रामाणिक कार्यकर्ते त्रासले आहेत. यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे शहर नियोजन शून्य होऊन धोक्याच्या पातळीवर आहे. मेहता हे बिल्डर, धनिकांच्या सोयीने काम करत आहेत, असा नाईकांचा आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव, टक्केवारीचे राजकारण, जागा हडपणे, गैरप्रकार यामुळे शहराचे वाटोळे झाले असून पुरेसे पाणी, वैद्यकीय व आरोग्य सेवा, मार्केट, पार्किंग, वाहतुक कोंडी, रस्ते-पदपथांची दुरवस्था, मार्केट, परिवहन व्यवस्था, शाळा आदी मुलभूत समस्या गंभीर बनल्याचे नाईक म्हणाले.
शहराचा विकास न होता फक्त आमदार मेहतांचाच विकास झाला आहे. शहरात लूटमार व भ्रष्टाचार बोकाळला असून विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल होत असल्याचे मीलन म्हात्रे म्हणाले.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतो. पण स्थानिक भाजपा आमदाराच्या दडपशाही व मनमानीविरुध्द हे पाऊल उचलले आहे. पारदर्शक व स्वच्छ कारभार आणि मुलभूत विकासाला प्राधान्य अशी आमची भूमिका असल्याचे गाडोदिया म्हणाले.
बंडखोर, नाराजांची सोय : या नव्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क चांगला आहे. मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून सर्व ९५ जागा लढवल्या जाणार आहेत. आता दोन्ही पक्षाचा उल्लेख ‘भाजपा’ म्हणूनच होणार असल्याने लोकांतही गोंधळ उडण्याची शक्यता आहे. भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी आहे. स्थानिक नेतृत्वाने अनेकांना उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. शिवाय आमदार मेहतांबद्दल नाराजी असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संघ व भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असलेल्या शैलेष पांडे यांनी समर्थकांसह नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. अशा नाराज, बंडखोरांना भार्इंदर जनविकास पार्टीचा म्हणजे नव्या भाजपाचा पर्याय खुला झाला आहे. अन्य पक्षातील इच्छुकांनाही या नव्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत. या दुसऱ्या भाजपाने सामाजिक संस्था, संघटनांनाही जोडण्याचे काम सुरु केले आहे.
भाजपाच्या पाठिंब्यावर महापौर व नंतर ज्येष्ठांना डावलून मेहता थेट भाजपाचे जिल्हाध्यक्ष झाले. २००९ मध्ये विधानसभेची उमेदवारी, २०१२ च्या पालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी व २०१४ ला पुन्हा विधानसभेची उमेदवारी मेहतांना मिळाली. सत्ता व संपत्ती झटपट मिळाल्यानंतर मेहता हे नेहमीच वादग्रस्त राहिले. त्यांच्यावर मनमानी, गैरप्रकार आदींचे आरोप सुरुच आहेत. भाजपात देखील त्यांनी स्वत:चा गोतावळा गोळा केला असून भाजपाची ध्येय धोरणे व तत्व कागदावरच उरले आहेत. सोयीनुसार पदे दिली जात आहेत. यातूनच संघ व भाजपाची तत्वे घेऊन चालणारे पक्षातले अनेक जुने - जाणते नाराज आहेत. पक्षात नव्याने आलेल्या अनेकांना भूलथापा देऊन बोळवण केल्याने ते देखील नाराज आहेत. त्याला या नव्या भाजपाने तोंड फोडले आहे.