भार्इंदरची दंगल होणार बंद?
By admin | Published: January 24, 2017 05:38 AM2017-01-24T05:38:54+5:302017-01-24T05:38:54+5:30
‘भार्इंदरमध्ये खेळायचे कुठे? हाच प्रश्न आहे’ या मथळ्याखाली खेळाबद्दलची अनास्था दर्शविणारे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये
भार्इंदर : ‘भार्इंदरमध्ये खेळायचे कुठे? हाच प्रश्न आहे’ या मथळ्याखाली खेळाबद्दलची अनास्था दर्शविणारे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये विश्लेषण प्रसिद्ध झाले असतानाच पालिकेच्या मालमत्ता विभागाने कुस्तीच्या आखाड्याला जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे शहरात टिकलेली दंगल बंद होते की काय, असा प्रश्न कुस्तीपटूंना पडला आहे.
मीरा-भाईंदर पालिकेच्या मालमत्ता विभागाने भार्इंदर पश्चिमेकडील समाजमंदिरात चार वर्षांपासून सुरु असलेला एकमेव दंगल आखाडा रिकामा करण्याची नोटीस भार्इंदर कुस्तीगीर संघाला धाडली आहे. यामुळे कुस्तीपटूंत कमालीची नाराजी पसरली आहे. संघातील सदस्य, दानशूर व्यक्ती व कुस्तीपटूंच्या पालकांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने हा आखाडा चालवला जातो. कुस्ती टिकविण्यासाठी संघाची धडपड चालू आहे. तेथे कुस्तीपटूंना मोफत प्रशिक्षण दिले जाते. आखाड्यात कुस्तीसाठी लागणारी माती शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यासाठी दर सहा महिन्याला सुमारे १० हजारांचा खर्च येतो.
मॅटवरील कुस्तीचा प्रकार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. मात्र कुस्तीपटूंना मॅटवरील कुस्तीचे धडे देण्यासाठी संघाकडे मॅटच नाही. मॅटची किंमत सहा लाखांहून अधिक आहे. त्याच्या देणग्यांसाठी संघाचा पाठपुरावा सुरु आहे. त्यातील सुमारे साडेतीन लाखांची मदत आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे. आखाड्याचा महिन्याचा खर्च माजी खासदार संजीव नाईक यांच्या देणगीतून भागविण्यात येत आहे.
पालिकेने कुस्ती प्रशिक्षणासाठी समाजमंदिराची जागा वार्षिक एक हजार १०० रुपये भाडे कराराने संघाला दिली. ते भाडे न थकविता उलट चुकवावे आणि हा एकमेव कुस्ती आखाडा टिकवून ठेवण्यासाठी संघाची धडपड सुरु आहे, त्याचवेळी दुसरीकडे पालिकेने जागा रिकामी करण्याची नोटीस पाठविल्याने कुस्तीचे काय होणार, अशी चिंता कुस्तीपटूंना लागली आहे. (प्रतिनिधी)