भार्इंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान बनतेय मद्यपींचा अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 09:35 PM2018-02-16T21:35:11+5:302018-02-16T21:35:28+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पालिकेचे भार्इंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हे एकमेव भव्य मैदान अस्तित्वात असुन तेथे खेळण्यासाठी स्थानिक तसेच शहराबाहेरील खेळाडू दररोज येत असतात. या मैदानातून काही रणजी तर भारतीय क्रिकेट संघात क्रिकेटपटूंनी प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे येथे क्रिकेट खेळणाऱ्यांसह फुटबॉल खेळणारे व योगा करण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच या मैदानात प्रभातफेरीसाठी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असल्याने शहरातील अनेक नागरीक येथे सकाळी प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यामुळे हे मैदान नेहमी गजबजलेले ठरत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने तीन पाळ्यांत प्रत्येकी दोन सुरक्षा रक्षक मैदानात नियुक्त केले आहेत. तसेच दिवसा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदार देखील नियुक्त करण्यात आला आहे. मात्र रात्रीच्या वेळी या मैदानात परिसरातील काही मद्यपी मद्यपार्टीसाठी येत असल्याची माहिती अनेकदा मिळत असल्याने त्याकडे तैनात सुरक्षा रक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप मैदानात प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. त्याच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आल्या असुन त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. अखेर १४ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास मद्यपींनी मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या व खाद्यपदार्थ तसेच सोडून तेथुन पोबारा केल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभातफेरी करणाय््राांच्या निदर्शनास आला. हा प्रकार मैदानात उपस्थित असलेले कंत्राटदाराचे कर्मचारी प्रकाश कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिला असता त्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच मैदानात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील समज दिल्याचे त्यांनी सांगितले.
या मैदानात अनेक लहान मुले खेळण्यासाठी तर महिला व ज्येष्ठ नागरीक प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यांच्यासमोर असे प्रकार उघड होऊ लागल्यास ते मैदानात येणार नाहीत. परिणामी मैदानाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत.
- प्रभातफेरीसाठी येणारे ज्येष्ठ नागरीक अजित पाटील