भार्इंदरला फटका, मीरा रोडचा फायदा

By admin | Published: May 3, 2017 05:36 AM2017-05-03T05:36:02+5:302017-05-03T05:36:02+5:30

आॅगस्टमध्ये होणाऱ्या मीरा-भार्इंदरच्या पालिका निवडणुकीसाठी मंगळवारी काढलेल्या प्रभाग रचना आरक्षण सोडतीत

Bharinder hit, advantage of Mira Road | भार्इंदरला फटका, मीरा रोडचा फायदा

भार्इंदरला फटका, मीरा रोडचा फायदा

Next

भार्इंदर : आॅगस्टमध्ये होणाऱ्या मीरा-भार्इंदरच्या पालिका निवडणुकीसाठी मंगळवारी काढलेल्या प्रभाग रचना आरक्षण सोडतीत भार्इंदरच्या पूर्व-पश्चिम भागाला फटका बसला असून वाढत्या नागरीकरणामुळे मीरा रोडचा फायदा होत त्यांचा राजकीय प्रभाव वाढला आहे. चार प्रभागांचा एक प्रभाग होणार असल्याने ९५ जागांपैकी ४६ जागा विविध आरक्षणानुसार महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. या प्रभाग रचनेनुसार राजकीय पक्षांची खास करून भाजपा, शिवसेनेची गणिते बदलणार आहे. नव्या रचनेनुसार त्यांना आखणी करावी लागेल.
आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या नियंत्रणाखाली आरक्षणाची सोडत काढली. नव्या प्रभाग रचनेत २४ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात ३० ते ३५ हजार लोकसंख्या निश्चित करुनच ही रचना करण्यात आली आहे. फक्त उत्तनच्या प्रभाग २४ हा तीन सदस्यांचा असेल. भार्इंदर पश्चिमेला सहा प्रभागात २३ सदस्य असतील. पूर्वी तेथे २८ सदस्य होते. ते पाचने कमी झाले आहेत. भार्इंदर पूर्वेलाही सहा ६ प्रभागात २४ सदस्य असतील. पूर्वी तेथे ३० सदस्य होते. ते सहाने घटले आहेत. मीरा रोडमध्ये आठ प्रभागांत ३२ सदस्य असतील. तेथील सदस्य चारने वाढले आहेत. पश्चिम महामार्गावरील काजुपाडा ते दहिसर चेकनाकादरम्यान एकच प्रभाग असेल. तेथे पूर्वी दोन सदस्य होते. ती संख्या आता दुप्पट झाली आहे. गोल्डन नेस्ट ते पश्चिम महामार्गादरम्यान तीन प्रभागांत १२ सदस्य असतील. (प्रतिनिधी)

बंडखोरीची भीती

एकंदरच आयारामांमुळे शिवसेना-भाजपांत इच्छुकांची संख्या वाढली असून त्यापैकी भाजपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसला मीरा रोडचे प्रभाग हाताशी धरावे लागणार असून राष्ट्रवादी व मनसेकडे तर खंबीर नेतृत्वच नसल्याने या पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार, हे पाहावे लागणार आहे. त्यातच बहुजन विकास आघाडीतील तीन नगरसेवक भाजपाच्या कमळावर विसावल्याने बविआच्या अस्तित्वालाच धक्का लागल्याचे बोलले जाते.

अशी असतील राजकीय समीकरणे
भार्इंदर पश्चिमेकडील प्रभाग १, ६, ७ हे भाजपाचे प्राबल्य असलेले प्रभाग मानले जातात. तेथे आता राष्ट्रवादीला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. प्रभाग ८ मध्ये मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भाजपाचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. या प्रभागात संमिश्र भाषक मतदार असल्याने भाजपाला येथील निवडणूक काहीशी जड जाणार आहे. प्रभाग २३ मध्ये शिवसेनेचा वरचष्मा असला तरी काही भागांवर भाजपाचे वर्चस्व असल्याने त्यांना आणखी जोर मारावा लागेल. प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक लियाकत शेख यांचे वर्चस्व असले तरी या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही चांगला राबता आहे. आता राष्ट्रवादीच्या वाताहतीमुळे शेख यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यास त्यांची परिस्थिती सुधारेल, असे मानले जाते.

उत्तनचा प्रभाग काबीज करण्यासाठी भाजपानेदेखील कंबर कसली आहे. भार्इंदर पूर्वेकडील प्रभाग २ मध्ये भाजपाचा प्रभाव असला तरी या प्रभागात याच पक्षाचे पाच विद्यमान नगरसेवक असल्याने उमेदवारी वाटपावेळी कसोटी लागणार आहे. प्रभाग ३ मध्ये सेनेचा प्रभाव वाढला असला तरी त्यांना येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या उत्तर भारतीयांना आपलेसे करावे लागणार आहे. प्रभाग ४ मध्ये भाजपाचे विद्यमान नगरसेवकच उमेदवारीचे दावेदार मानले जात असले, तरी दुप्पट दावेदारांनी अगोदरपासून फिल्ंिडग लावल्याने येथेही उमेदवारीवाटपाचे संकट भाजपासमोर उभे राहणार आहे. प्रभाग ५ मध्ये भाजपाच्या सात विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून दावेदारीसाठी इच्छुकांची भर पडली आहे. प्रभाग १० व ११ मध्ये शिवसेनेचाच प्रभाव असला तरी त्यात यंदा अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव ठेवल्याने सेनेला उमेदवार शोधावा लागणार आहे.

मीरा रोड येथील प्रभाग ९, १९ व २२ मध्ये काँग्रेसचा प्रभाव असला तरी प्रभाग २१ मध्ये भाजपाच्या नगरसेवकांचा प्रभाग विलीन झाल्याने काँग्रेससाठी काट्याची टक्कर असेल. त्यात काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद सामंत यांना भरपूर कसरत करावी लागणार आहे. मीरा रोड येथीलच गोल्डन नेस्ट ते पश्चिम महामार्गादरम्यान पूर्वीच्या एकाच प्रभागातून ३ प्रभागांची निर्मिती केली आहे. या प्रभागातून गतवेळी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता निवडून आल्याने त्यांचा या प्रभागावर पगडा कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महामार्गावरील काजुपाडा ते दहिसर चेकनाका दरम्यान एकच प्रभाग झाला आहे. त्यावर सेनेचा प्रभाव असला तरी काशीगाव येथील भाजपाचा प्रभाव त्यांना मारक ठरू शकतो.

चार उमेदवारांच्या पॅनलप्रमाणे आरक्षणनिहाय प्रभागरचना

प्रभाग १ - खुल्या प्रवर्गासाठी दोन, इतर मागासवर्गीयांसाठी व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग २ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग ३ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग ४ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग ५ - सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर मागासवर्गीय सर्वसाधारण महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा.
प्रभाग ६ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग ७ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग ८ - सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर मागासवर्गीय महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा.
प्रभाग ९ - सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर मागासवर्गीय महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्ग व इतर मागासवर्गातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग १० - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग ११ - सर्वसाधारण प्रवर्ग व इतर मागासवर्गीय महिलांसाठी प्रत्येकी एक व खुला प्रवर्ग व अनुसूचित जातीमधील सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग १२ - खुल्या प्रवर्गासाठी दोन, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग १३ - खुला प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गातील व अनुसूचित जाती प्रवर्गाती महिलांसाठी प्रत्येकी एक, इतर मागासवर्गीयांसाठी एक जागा.
प्रभाग १४ - अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक, खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीयांसाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग १५ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग १६ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय महिलांसाठी एक व खुल्या प्रवर्गासाठी एक जागा.
प्रभाग १७ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग १८ - सर्वसाधारण प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक, अनुसूचित जातीमधील सर्वसाधारण प्रवर्ग व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग १९ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा.
प्रभाग २० - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा.
प्रभाग २१ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा.
प्रभाग २२ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा.
प्रभाग २३ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा.
प्रभाग २४ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक, खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा.

Web Title: Bharinder hit, advantage of Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.