भूखंड घोटाळा भाजपाच्या संगनमताने
By admin | Published: May 9, 2016 01:56 AM2016-05-09T01:56:15+5:302016-05-09T01:56:15+5:30
मीरा भाईंदरमधील भूखंडाचे आरक्षण उठवून तो बिल्डरच्या घशात घालण्याचा कट पद्धतशीरपणे रचण्यात आल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला
ठाणे : मीरा भाईंदरमधील भूखंडाचे आरक्षण उठवून तो बिल्डरच्या घशात घालण्याचा कट पद्धतशीरपणे रचण्यात आल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. भूखंडाचा वाद ठावूक असूनही मुख्यमंत्री उद््घाटनासाठी तेथे गेले, याचाच अर्थ त्यांचाही या गैरव्यवहाराला पाठिंबा होता, असाच असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
हे प्रकरण धसास लावले तर ते भाजपच्या अंगलट येईल, म्हणून ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून अश्विनी जोशी यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची तत्काळ उचलबांगडी करण्यात आली. आधी जोशी यांना पाठिंबा देणारे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक या प्रकरणातून काढता पाय का घेतला, असा प्रश्नही त्यांनी केला.
मीरा-भाईंदरची राखीव जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी सोयीचे व्हावे, अशा पद्धतीने प्रस्ताव मंजूर झाले. मुख्यमंत्री स्वत: त्या कार्यक्रमाच्या शुभारंभाला गेले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना कळले, की ती जागा सरकारची आहे. तसा अहवालही त्यांनी दिला. त्यामुळे जोशी यांनी त्या जागेवरील विकासाला स्थगिती दिली होती. जोशी यांची मुदतीपूर्वी बदली झाली आणि लगेचच कोकण आयुक्तांनी स्थगिती उठवली. ती उठवताना त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा तांत्रिक आहे. कोकण आयुक्तांचा निकाल काहीही असू द्या. परंतु तांत्रिक बाजू लक्षात घेऊनच तो देण्यात आलेला आहे, हे समजून घ्यायला हवे. सरकारची ११ एकर जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार झाला आहे, असा तपशील त्यांनी दिला.
आजतागायत बिल्डरने किंवा ज्यांनी या प्रकरणात सहभाग घेतला त्यांनी या ११ एकरच्या जागेच्या मालकीची खरी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे महसूल खात्याने हालचाल करायला हवी होती. ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली. सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. त्यांची बदली केली. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा बाजुला ठेवण्यात आला, याकडे लक्ष वेधून सावंत म्हणाले, एखाद्या बिल्डरच्या घशात ती जागा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन आरक्षण बदलावे.
आम्ही कोणताही गैरकारभार खपवून घेणार नाही. जोशींच्या मागे ठामपणे उभे राहू, असे वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. असे असताना आता त्यांनी अळीमिळी गुपचिळीचे धोरण का स्वीकारले? विरोध का केला नाही. शिवसेनेलाही यातून काही लाभ मिळाला का? कोणी कोणाची तोंडे बंद केली का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येथील मंत्र्यांनी देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही वाघ आहोत, अशा डरकाळ््या शिवसेनेचे नेते फोडतात. परंतु हे सर्कशीतले वाघ असल्याची कडवट टीकाही त्यांनी केली. भ्रष्टाचाराच्या सर्व गोष्टींत भाजपा आणि शिवसेना एकमेकांना सोयीची धोरणे घेऊन चालली आहे. शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकाची भूमिका बजावायची. भाजपावर टीका करायची आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आला की दोघांनी एकत्र यायचे, असा कारभार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, संजय चौपाने उपस्थित होते. (प्रतिनिधी)