‘भातसा’ ९९ टक्के भरले, गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:41+5:302021-09-12T04:46:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर/वासिंद : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. भातसा धरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर/वासिंद : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. भातसा धरण सध्या ९९.०६ टक्के भरले असून, धरणाचे पाचही दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी भातसा नदीच्या प्रवाहात उतरणे नागरिकांनी टाळावे किंवा पाण्यात उतरताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच नदीलगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
भातसा धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असली, तरी नदीकाठच्या गावांची चिंता मात्र वाढली आहे. भातसा नदी किनाऱ्यालगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, तेथील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सय्या धरणाची पाणी पातळी १४१.७० मी असून, पूर्ण संचय पातळी १४२.०७ मी. आहे. आज धरण क्षेत्रात ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
------------
विद्युत गृहातून सोडण्यात आलेला विसर्ग २१.१३६ क्युसेक्स इतका आहे. भातसा नदीत पाणी जास्त नसते, तेव्हाच धरणातून पाणी सोडले जाते. धरणातून पाणी सोडल्यामुळे सापगाव पूल कधीही पाण्याखाली बुडाला नाही, त्याबाबत आम्ही नेहमी काळजी घेतो.
- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, भातसा धरण.