Bhatsa dam: भातसा धरण भरले! पाणी नदीत सोडले; काठावरील गावांना सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:58 AM2021-09-11T10:58:48+5:302021-09-11T10:59:04+5:30
Bhatsa dam Overflow: या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना जारी करण्यात आल्याचे भातसानगर येथील भातसा धरण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागाने स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात भातसा धरणाची पाणी पातळी १४१.७० मी एवढी असून या धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाणात सतत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने धरणात येणार्या पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे या भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय परीचलन सुचीनुसार, नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे १, २, ३, ४ व ५ या क्रमांकाचे पाच वक्रव्दारं ०.५० मीटर उघडण्यात येत आहेत. यामुळे भातसा धरणातून सुमारे २७२.७० क्युमेक्स (घ.मी./सेकंद (९६३०.४० एवढा विसर्ग प्रवाहीत करण्यात येणार आहे. यास अनुसरून भातसा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देत गांवकर्यांना नदी पात्रात न उतरण्याचे सूचित करण्यात येत आहे.
याशिवाय भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, सापगाव व नदीकठावरील इतर गावांतील सरपंच. तलाठी ग्रामसेवक यांना गावातील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याबाबत सूचित करण्यात आले असून या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना जारी करण्यात आल्याचे भातसानगर येथील भातसा धरण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागाने स्पष्ट केले आहे.