भाऊ गणपत वाचनालय इतिहासजमा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:31 AM2018-04-24T01:31:32+5:302018-04-24T01:31:32+5:30

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या वाचनालयाचे आणि पुस्तकांचे आता फक्त भग्न अवशेषच शिल्लक दिसतात.

Bhau Ganpat Lecturer History History? | भाऊ गणपत वाचनालय इतिहासजमा?

भाऊ गणपत वाचनालय इतिहासजमा?

googlenewsNext

मुरबाड : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश साम्राज्याविरु द्ध लढण्यात अनेकांना प्रेरणादायी ठरलेले आणि राज्यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशा शतकापूर्वीच्या सार्वजनिक वाचनालयांपैकी एक असलेले मुरबाडचे ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय. मात्र, एवढी समृद्ध परंपरा असूनही हे वाचनालय सध्या अखेरची घटका मोजत आहे. ११८ वर्षांपूर्वीच्या या वाचनालयात एकेकाळी मोठी साहित्यसंपदा होती. मात्र, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या वाचनालयाचे आणि पुस्तकांचे आता फक्त भग्न अवशेषच शिल्लक दिसतात.
मुरबाड शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या मोकळ्या जागेत २ जानेवारी १८९४ रोजी जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर सिळकाळ यांच्या हस्ते भाऊ गणपत वाचनालयाच्या पायाभरणीचा कार्यक्र म करण्यात आला होता. १९०१-०२ मध्ये बांधकाम पूर्ण होऊन वाचनालय सुरू करण्यात आले. स्वातंत्र्यसंग्राम काळात सुरू झालेल्या या वाचनालयातील वाङ्मयसंपदेमुळे प्रभावित होऊन मुरबाडमधील अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिले. या ऐतिहासिक वाचनालयात ज्ञानकोषागार केतकर यांचे खंड, महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय, विविध ग्रंथ, क्र ांतिकारकांचे तत्कालीन साहित्य, कथा, कादंबऱ्या अशी सुमारे सात हजार पुस्तके होती, अशी माहिती काही जुन्या वाचकांनी दिली.
काही वर्षांपूर्वी या वाचनालयाचे छप्पर पावसामुळे गळून पडले. त्यामुळे आतील सगळी पुस्तके, ग्रंथ पाण्यामुळे पूर्णपणे कुजले. वाचनालयाच्या या अवस्थेकडे लक्ष देण्यास तत्कालीन मुरबाड ग्रामपंचायतीसह कोणालाच वेळ मिळाला नाही. यातील काही १० ते १२ पुस्तके मुरबाड नगरपंचायतीकडे शिल्लक आहेत. बाकी सगळी साहित्यसंपदा पाण्यात गेली. पुस्तकांनी भरलेल्या या वाचनालयाने शतकाचा उंबरठा पार पडल्यानंतर काही वर्षांपूर्वी राज्यातील इतर वाचनालयांबरोबर महाराष्ट्र सरकारने या वाचनालयाचा गौरव करून पाच लाखांचा निधी दिला होता. तरीही, हे ऐतिहासिक वाचनालय पुन्हा उभे राहिले नाही.
सात वर्षांपूर्वी मुरबाड ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयात एका छोट्याशा खोलीत हे वाचनालय सुरू करण्यात आले असले, तरी त्याठिकाणी १५-२० पुस्तके आणि रोजच्या वृत्तपत्रांची रद्दीच दिसते. शतकापूर्वीच्या या वाचनालयाला पुन्हा पूर्वीचे गतवैभव मिळावे, यासाठी मुरबाड नगरपंचायत आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी अनेक वाचनप्रेमींची अपेक्षा आहे.

मुरबाडचे ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय हे बंद असल्यामुळे तालुक्यातील वाचकवर्गाची मोठी गैरसोय होत आहे. या वाचनालयाच्या नूतन इमारतीसाठी सुमारे एक कोटी ३० लाखांचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले असून थोड्या दिवसांत ते काम सुरू करण्यात येईल.
-मोहन सासे, नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड

Web Title: Bhau Ganpat Lecturer History History?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे