भाईंदरच्या नाट्यगृहाचे रविवारी भूमीपूजन
By admin | Published: August 25, 2015 11:01 PM2015-08-25T23:01:56+5:302015-08-25T23:01:56+5:30
नाट्य संस्कृतीला वाव मिळून त्यात वाढ होण्याच्या उद्देशाने शहरात नाट्यगृह साकारण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ६ वर्षांपासून पालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून
- राजू काळे ल्ल भाईंदर
नाट्य संस्कृतीला वाव मिळून त्यात वाढ होण्याच्या उद्देशाने शहरात नाट्यगृह साकारण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ६ वर्षांपासून पालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ३० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.
पालिकेने डीबी रिअॅलिटी या विकासक कंपनीला मौजे महाजनवाडी येथे भव्य गृहप्रकल्प बांधण्याची परवानगी दिली होती. या परवानगीपोटी विकासकाने पालिकेला नागरी सुविधा भूखंडाच्या माध्यमातून सुमारे ७ हजार चौमी जागा नाट्यगृहासाठी देणे अपेक्षित होते. परंतु, यातील एक फुटाची जागाही विकासकाने पालिकेला न देता ती गिळंकृत करण्याचा डाव पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने साधला होता.
विकासकाने लाटलेली जागा पालिकेच्या ताब्यात मिळून त्यावर नाट्यगृह व्हावे, यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ६ वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. प्रसंगी आंदोलन छेडून पालिकेची नाकाबंदीसुद्धा केली होती. परंतु, प्रशासनाने केवळ कागदी कारवाई करून वेळ मारून नेत नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा कारभार चालविला होता. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेवर संतापलेल्या आ. सरनाईक यांनी २०१४ मध्ये तत्कालीन आयुक्त सुभाष लाखे यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन पुकारल्याने प्रशासनाची चांगलीच गोची केली होती. त्या वेळी प्रशासनाने डी.बी. रिअॅलिटी या विकासक कंपनीच्या गृहप्रकल्पाची बांधकाम परवानगी रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली होती.
बांधकाम विकासकाकडून करण्यात येणार आहे. परंतु, त्यातील अंतर्गत कामे पालिकेच्या निधीतून करण्यात येणार असून यंदाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत हे नाट्यगृ साकारणार असून त्यामुळे महानगरातील संस्कृतीत विश्वाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या अत्याधुनिक वास्तूची आवश्यक ती काळजी ती साकार झाल्यानंतर घेण्याची खबरदारी महापालिकेने आधीच घ्यायला हवी, अन्यथा त्याची दुरावस्था अन्य महापालिकांनी साकारलेल्या नाट्यगृहांसारखी होईल.
बांधकाम परवानगी रद्द होण्याच्या भीतीपोटी विकासकाने सुमारे ७ हजार चौमी जागेपैकी ४ हजार ८०० चौमी जागा पालिकेच्या ताब्यात दिली आहे. या भूखंडावर सुमारे १२०० आसनक्षमता असलेल्या तीन मजली भव्य व सुसज्ज नाट्यगृहासह सुमारे १५० आसनक्षमता असलेले मिनी थिएटर बांधण्यासाठी प्रशासनाने त्याचा नकाशा तयार केला आहे. यान नाट्यगृहाचा आराखडा ठाण्याचे वास्तुविशारद शशिकांत देशमुख यांच्यामार्फत तयार करण्यात आला.