भवानीनगर पुराच्या पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:26+5:302021-07-23T04:24:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिकणघर : कल्याण शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-मुरबाड रोडवरील भवानी नगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री पुराचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणघर : कल्याण शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-मुरबाड रोडवरील भवानी नगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री पुराचे पाणी शिरले. परिणामी अनेक चाळीतील घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या घरातील सर्व सामान भिजले. पाणी वाढतच असल्यामुळे भीतीने नागरिकांना घराला कुलूप लावून इतरत्र स्थलांतर करावे लागले.
वालधुनी नदीच्या किनारी भवानीनगर वसला असून नदीच्या वर पाणी आले की हा परिसर जलमय होते. त्यामुळे रहिवाशांना घर सोडावे लागते. गुरुवारी मध्यरात्री नंतर २ वाजता पाणी आल्याचे कळताच महिला आणि लहान मुलांच्या आरडाओरडीमुळे रहिवासी जागे झाले. त्यामुळे त्यांनी उंच भागातील आपले नातेवाईक व परिचितांकडे स्थलांतर केले.
येथील फॉरेस्ट सोसायटी, मातृछाया, जयदुर्गे, नागेश्वर, सुदर्शन, भीमकृपा, दित्यशिल्पा, दीपस्तंभ, प्रज्ञाकिरण, योगेश अपार्टमेंट, मयूर सोसायटी, साईनाथ वडेश्वर, आणि त्रिमूर्ती कॉलनी आदी वसाहतींना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. नागरिकांचे पहाटेपासून हाल झाले. रुनील उतेकर, गणेश नाईक, विनोद शिरवाडकर, भरत गायकवाड, मोटू जाधव, शंकर जाधव आदी स्थानिक रहिवाशांनी ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांच्या सामानासह महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्यास मदत केली. काही कार्यकर्ते सकाळी बाधितांना वडापाव, चहा, बिस्कीट पुडे वाटप करताना दिसले.
-------------------------------