भाईंदरमध्ये आवाज पोलिसांचाच, ध्वनिप्रदूषणाच्या जाचातून नागरिकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:39 AM2019-10-03T01:39:19+5:302019-10-03T01:39:30+5:30
मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे.
मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे. दहा ते सव्वादहा दरम्यान बहुतांश मोठे आणि व्यावसायिक आयोजकांचे कार्यक्रम बंद होत असल्याने नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाच्या जाचातून सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
शहरात नवरात्रीला सुरूवात झाली असून विधानसभा निवडणुका असल्याने नवरात्रीला राजकीय रंग आला आहे. राजकारणी व लोकप्रतिनिधींमध्ये गरबा आयोजनासाठी वेगवेगळे गायक व कलाकार आणणे, बक्षिसे यात स्पर्धाच लागली आहे. आॅर्केस्ट्रा साऊंड, डीजेसारख्या कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनियंत्रणांचा दणदणाट चालला आहे. उमेदवार व त्यांचे समर्थक नवरात्रीच्या आड आपला प्रचार करण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत.
रात्री दहापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी असली तरी त्या नंतरही सर्रास ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद सुरू असल्याचा अनुभव आहे. पोलीस फक्त येऊन समज देऊन गेले की पुन्हा मंडळवाले ध्वनिक्षेपक सुरु करतात. कानठळ्या बसवणाºया आवाजाच्या वाढत्या पाºयामुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. ज्येष्ठ नागरिक, रूग्ण, लहान मुले यांना तर आवाज जाचक ठरत आहे. विद्यार्थी व कामावर जाणाºया बहुसंख्य नागरिकांनाही झोप पूर्ण होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. निदान रात्री १० वाजता ध्वनिक्षेपक बंद होईल अशी त्यांची आशा असते.
यंदाच्या नवरात्रीलाही सुरूवातीला तसा अनुभव आला होता. पण ध्वनिप्रदूषणाने होणाºया त्रासाने वैतागलेल्या जागरूक नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी स्वत:हून गस्त घालून रात्री १० नंतर ध्वनिप्रदूषण करणा-या ध्वनिक्षेपक वा ध्वनियंत्रणांसह आयोजकांवर कारवाई करतानाच गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यंदा मात्र पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाने त्रासलेल्या वृध्द, रुग्ण, विद्यार्थी, लहान मुले आदी नागरिकांना सुखद धक्का देतानाच मोठा दिलासा दिला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ध्वनिप्रदूषणाचा वाढता धोका आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास पाहता पोलिसांनी रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद बंद करण्याचे आदेश दिले होते. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनीही पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासह वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले होते.
वरिष्ठांच्या आदेशांमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनीही कुणाचा मुलाहिजा न ठेवता वेळेची मर्यादा पाळण्याची कार्यवाही चालवली आहे. काही ठिकाणी आयोजक मुजोरी करत असल्याने त्या ठिकाणी पोलिसच तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेचे नागरिकांनी कौतुक केले आहे. थोडी कडक पावले उचलल्याशिवाय जरब बसणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
यंदा पोलिसांनी स्वत:हून ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करायला लावल्याने माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसह रूग्ण, मुले, महिला व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे १० वाजता कार्यक्रम बंद होत असल्याने घरातील लहान तसेच तरुण मुले लवकर घरी परतत असल्याने पालकांच्या जीवाला लागणारा घोर यंदा मिटला आहे.
- अनंत आंगचेकर, ज्येष्ठ नागरिक, भाईंदर
नवरात्रीचे धार्मिक पावित्र्य राहिलेले नाही. केवळ मौजमजा चालली आहे. नवरात्रीच्या नावाने मुले रात्री उशिरापर्यंत नाहक फिरत राहतात ते बंद झालेच पाहिजे. ध्वनिक्षेपकची रात्री दहाची वेळ काटेकोर पाळली जावी. आवाजाची पातळीही तपासली जावी. १२ पर्यंतची सवलत बंद करावी. वाटल्यास शेवटचाच एक दिवस द्यावा. - जागृती केळकर, गृहिणी, भाईंदर