भाईंदर रेल्वे पुलावर लूटमार करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींमध्ये २ अल्पवयीन मुलं
By धीरज परब | Published: November 28, 2022 08:14 PM2022-11-28T20:14:41+5:302022-11-28T20:14:49+5:30
पुलावर तिघाजणांनी चाकूचा धाक दाखवत रोहन यांचा मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन असा ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी लुटून पसार झाले .
मीरारोड - भाईंदरच्या रेल्वे पादचारी पुलावरून जाणाऱ्या प्रवाश्याना लुटणाऱ्या त्रिकुटास नवघर पोलिसांनी पकडले आहे . त्यातील दोघेजण हे अल्पवयीन आहेत .
नालासोपारा येथे राहणारे रोहन निवडुंगे हे बोरिवलीच्या एका मॉल मध्ये काम करतात . त्यांच्या भाईंदर येथे राहणाऱ्या सहकाऱ्या सह ते बोरिवली वरून दुचाकीने भाईंदरला आले होते . भाईंदर रेल्वे स्थानकातून मध्यरात्रीच्या सुमारास नालासोपारा साठी लोकल पकडण्यास ते रेल्वे ऐवजी चुकून पालिकेच्या पादचारी पुलावर चढले . पुलावर तिघाजणांनी चाकूचा धाक दाखवत रोहन यांचा मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन असा ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी लुटून पसार झाले .
१८ नोव्हेम्बर रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सहायक आयुक्त शशिकांत भोसले व वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत सुनील राठोड रा . यादगीर , कर्नाटक ह्याला २४ नोव्हेम्बर रोजी अटक केली . तर गुन्हे शाखा १ ने गुन्ह्यातील अन्य दोन आरोपीना पकडून नवघर पोलिसांच्या स्वाधीन केले . सदर दोन्ही आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याने सोमवारी बाल न्याय मंडळ समोर हजर करण्यात आले .