भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात

By धीरज परब | Published: November 30, 2022 07:16 PM2022-11-30T19:16:58+5:302022-11-30T19:17:18+5:30

फेरीवाला पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी  

Bhayandar railway station and main roads are infested with hawkers | भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात

भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात

Next

मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानक परिसर व भाईंदर मधील मुख्य वर्दळीचे रस्ते हे फेरीवाले - हातगाडी वाल्यांच्या विळख्यात असून नागरिकांना चालण्यास पदपथ व रस्ते मोकळे राहिलेले नाहीत . यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे . त्यामुळे फेरीवाला पथक प्रमुखासह संबंधित प्रभाग अधिकाऱ्यां वर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला फेरीवाले आणि हातगाडी वाल्यांचा विळखा पडला आहे . त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर पडणे अडचणीचे झाले आहे . फेरीवाल्यां मुळे गर्दी होते . स्टेशन परिसर असल्याने सार्वजनिक बस , रिक्षा , दुचाकी व अन्य वाहनांची मोठी वर्दळ असते . फेरीवाल्यां मुळे परिसर मोकळा नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . रेल्वे स्थानक पासून १५० मीटर परिसरात फेरीवाले - हातगाड्या ना मनाई असताना देखील दिवस रात्र फेरीवाले अतिक्रमण करून असतात. 

तीच गत भाईंदर मधील मुख्य रस्त्यांची झाली आहे . भाईंदर पूर्वेचे स्टेशन मार्ग , बाळाराम पाटील मार्ग , तलाव मार्ग , नवघर मार्ग , इंद्रलोक नाका व मुख्य रस्ता , जेसल पार्क - राहुल पार्क रस्ता व नवघर फाटक मार्ग असे मोजून ६ - ७ रस्ते आहेत . मात्र हे रस्ते , पदपथ व नाके फेरीवाल्यांच्या घश्यात घालण्यात आले आहेत . 

भाईंदर पश्चिमेला तर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व डॉ . बाबासाहेब आंबेडकर ६० फूट मार्ग , मॅक्सस परिसर असे मोजून तीन - चार रस्ते त्यावर सुद्धा फेरीवाले - हातगाडीवाल्यानी उच्छाद मांडला आहे . त्यांना बेकायदा वीज पुरवठा होत आहे. भाईंदर मधील पदपथ व रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने नागरिकांना नाईलाजाने जीव मुठीत ठेऊन वाहन वर्दळीच्या रस्त्यांवर चालावे लागत आहे. लहान मुलं , विद्यार्थी , वृद्ध , महिला आदींना तर अश्या कोंडीतून मार्ग काढणे जाचक झाले आहे. राजरोस फेरीवाले व हातगाड्या लागत असताना फेरीवाला पथक व प्रभाग समितीचे अधिकारी करतात काय ? असा सवाल लोक करत आहेत . त्यांच्या आर्थिक भ्रष्ट संगनमताशिवाय हे शक्य नसल्याने अश्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस वरिष्ठ अधिकारी दाखवत नसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे . 

 

Web Title: Bhayandar railway station and main roads are infested with hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.