भाईंदर ते मुंबई जलवाहतूक सेवा चालू होणार
By धीरज परब | Published: February 12, 2023 02:29 PM2023-02-12T14:29:54+5:302023-02-12T14:30:30+5:30
Bhayandar: मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे .
मीरारोड - मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे .
भाईंदर वरून मुंबईसाठी जलवाहतूक सुरु करावी व उत्तम येथील समुद्रात जलक्रीडा सुरु करण्याची मागणी आ . जैन यांनी मेरीटाईम बोर्ड व शासना कडे चालवली आहे . त्या अनुषंगाने आ. जैन यांच्या मागणी वरून शुक्रवारी मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या कडे शुक्रवारी बैठक झाली .
त्यात हार्बर क्रूसने भाईंदर वरून जलवाहतूक सुरु करण्यासह भाईंदर ते वांद्रे सी लिंक पर्यंत लवकरच वॉटर टॅक्सी चालू करण्याबाबत आवश्यक पावले उचलण्याचा आदेश उपस्थित अधिकाऱ्याना डॉ . सैनी यांनी दिले . येत्या आठ ते दहा महिन्यात सदरची वॉटर टॅक्सी सेवा चालू करण्याबाबत आपण स्वत: प्रयन्तशील राहू असे डॉ.सैनी यांनी आश्वस्त केले .
तर मीरा भाईंदर शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जल क्रीडा चालू करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्याला आठवड्या भरात परवानगी देण्यात येईल असे डॉ.सैनी यांनी सांगितल्याची माहिती आ . जैन यांनी दिली . बैठकीला मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी , महानगर पालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते .