भाईंदर महिला विशेष लोकल २५ डिसेंबरपासून सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:18 PM2018-12-04T17:18:11+5:302018-12-04T17:19:07+5:30
भाईंदर रेल्वे स्थानकातून आता महिला विशेष लोकल 25 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
ठाणे : भाईंदर रेल्वे स्थानकातून आता महिला विशेष लोकल 25 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मंगळवारी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर येथून ९:०६ ची बंद केलेली महिला विशेष लोकल सुरु होण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, डीआरएम मुकुल जैन, डीआरएम सुहानी मिश्रा, आर पी एफ डी आय जी सौरभ त्रिवेदी, मधुकर रेड्डी, पी एन रॉय इत्यादी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी भाईंदर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते राजू भोईर, माजी उपमहापौर प्रवीण पाटील, उपजिल्हाप्रमुख स्नेहल सावंत- कल्सारिया, नगरसेवक कमलेश भोईर, नगरसेविका नीलम धवन, शहर संघटक सुप्रिया घोसाळकर, तसेच भाईंदर रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.
खासदार राजन विचारे यांनी ही लोकल तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बंद केली असे विचारले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही सर्वे करून ही लोकल बंद केली असे बोलताच, खासदारांनी त्यांना सध्याच्या गर्दीचे छायाचित्र दाखवले व सांगितले की, ही रेल्वे त्वरित चालू करा अन्यथा मला स्वत:ला रेल्वे रुळावर उतरावे लागेल. आम्ही नवीन रेल्वेची मागणी न करता आमची जी बंद केलेली लोकल तीच पुन्हा चालू करा असे सांगितले.
यावर, महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता यांनी ही रेल्वे आम्ही २५ डिसेंबर पर्यंत नक्की चालू करू, असे आश्वासन दिले आहे. तसेच, खासदार राजन विचारे यांनी मिरारोड व भाईंदर स्थानकावरील सरकते जिने, फलाटांची लांबी, तसेच फलाटांवर छत बसविणे याबाबत विचारले असता, महाव्यवस्थापकानी ही सर्व कामे आम्ही मार्च २०१९ अखेर पर्यंत पूर्ण करू असेही आश्वासन दिले.